Reels Addiction Shocking News: सोशल मीडियावर छोटे व्हिडीओ किंवा रिल्स पाहणं हे आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. खास करुन तरुण मंडळी आणि मध्यमवयीन लोक रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून काही वेळ हे रिल्स पाहतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये झोपण्यापूर्वी व्हिडीओ पाहतानाचा स्क्रीन टाइम आणि आरोग्याचा थेट संबंध दिसून आला आहे. जे तरुण झोपण्याच्या आधी रिल्स पाहतात त्यांना हायरटेन्शनचा अधिक त्रास होतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.
बीएमसी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालामध्ये एकूण 4 हजार 318 तरुण आणि मध्यमवयीन लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. चीनमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात असं दिसून आलं की जे लोक झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना उच्चरक्तदाब आणि हायपरटेन्शनचा अधिक त्रास असतो.
बंगळुरुमधील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दिपक कृष्णमूर्ती यांनी या संशोधनामधील हा तपशील आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन शेअर केला आहे. "मन विचलित करण्यापासूनच ते वेळ वाया घालवण्याबरोबरच रिलचं व्यसन तरुणांमधील उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतो हे दिसून येत आहे. आता आपण अनइन्स्टा होण्याची गरज आहे," असं डॉ. कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे.
Apart from being a major distraction and waste of time, reel addiction is also associated with high #BloodPressure in young and middle-aged people. Time to #UnInsta!! #DoomScrolling #MedTwitter pic.twitter.com/Kuahr4CZlB
— Dr Deepak Krishnamurthy (@DrDeepakKrishn1) January 11, 2025
याच अध्ययनामध्ये झोपण्यापूर्वी रिल पाहण्यात किती वेळ खर्च केला जातो याबद्दलही भाष्य करण्यात आलं आहे. "सामान्यपणे स्क्रीन टाइममध्ये टीव्ही पाहण्याचा, व्हिडीओ गेम्स खेळण्याचा, कंप्युटर वापरण्याचा वेळ ग्राह्य धरला जातो. मात्र टीव्ही पाहता लोक इतरही कामं करतात. मात्र आमच्या अभ्यासामध्ये स्क्रीनटाइम हा लोक बेडवर गेल्यानंतर छोटे व्हिडीओ पाहाण्यासाठी किती वेळ घालवतात याबद्दलचा आहे," असं संशोधकांनी म्हटलं आहे.
चीनमधील हेबेई मेडिकल युनिव्हर्सिटीतले संशोधक फेंगडे ली, फँगफांग मा, शांग्यु लिऊ, ले वांग, लिशुआंग जी, मिंगक्वी झेंग आणि गँग लिऊ यांनी या संशोधनासाठी काम केलं आहे. या संशोधनाचा अहवाल समोर आल्यानंतर या अभ्यासकांनी, लोकांनी झोपेच्या वेळी लहान व्हिडिओ पाहण्याच्या वेळेवर म्हणजेच स्क्रीनटाइमवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे असं म्हटलं आहे.