अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रामध्ये होणार टक्कर, 'सन ऑफ सरदार 2' ची रिलीज डेट समोर

अजय देवगनचा या वर्षी 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 16, 2025, 04:47 PM IST
अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रामध्ये होणार टक्कर,  'सन ऑफ सरदार 2' ची रिलीज डेट समोर title=

Son of Sardaar 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा 2012 मध्ये 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जबरदस्त ॲक्शन आणि कॉमेडी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला होता. अशातच आता या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या सिक्वेलची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. नुकतीच 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. विजय कुमार अरोरा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अजय देवगनसोबत मृणाल ठाकूर, संजय दत्त आणि रवी किशन दिसणार आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शन अश्विनी धीर यांनी केले होते.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगन यांच्यात होणार टक्कर 

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. वास्तविक, सिद्धार्थ मल्होत्राचा 'परम सुंदरी' हा चित्रपट 25 जुलैला प्रदर्शित होत आहे. तर अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजे या दोन्ही कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 'परम सुंदरी'मध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर तुषार जलोटा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आता या टक्करमध्ये बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.

या चित्रपटांमध्ये दिसणार अजय देवगन

'सन ऑफ सरदार 2' व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता अजय देवगन 2025 मध्ये आणखी काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 17 जानेवारीला अजय देवगनचा 'आझाद' चित्रपट प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगनचा पुतण्या अमन देवगन डेब्यू करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनही दिसणार आहे. त्याचबरोबर अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 1 मे रोजी रिलीज होणार आहे. वर्षाच्या शेवटी अजय देवगन 'दे दे प्यार दे दे 2' घेऊन येणार आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून 2025 मध्ये अजय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसणार आहे. 

परंतु, 'सन ऑफ सरदार' चित्रपटाच्या पहिल्या भागात मृणाल ठाकूरच्या जागी सोनाक्षी सिन्हा होती, मात्र यावेळी ती या चित्रपटाचा भाग नसणार आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, निर्मात्यांनी पहिला भाग बनवण्यासाठी 67 कोटी रुपये खर्च केले आणि चित्रपटाने जगभरात 135.12 कोटी रुपयांची कमाई केली होती.