होशियारपूर: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी १९८४ च्या शीख दंगलीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सॅम पित्रोदा यांना खडसावले. सॅम पित्रोदा यांनी जे काही म्हटले ते चूक होते. यासाठी त्यांना संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांना स्वत:च्या वक्तव्याची शरमही वाटला पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले. तसेच १९८४ च्या शीख दंगलीतील सर्व दोषींना शिक्षा होईल, याची हमीही यावेळी राहुल गांधी यांनी दिली.
येत्या १९ तारखेला पंजाब आणि दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शीखविरोधी प्रतिमेचा काँग्रेसला फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने यापूर्वीच जाहीर निवेदन प्रसिद्ध करून सॅम पित्रोदा यांच्या विधानापासून फारकत घेतली होती. मात्र, तरीही नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सॅम पित्रोदा यांना शीख दंगलीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी पित्रोदा यांनी 'जे झालं ते झालं' असे उत्तर दिले होते. हाच धागा पकडत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आगपाखड केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते १९८४ मध्ये दंगल झाली तर झाली असं म्हणतात. हे नेते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? ते गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे आहेत. ते राजीव गांधींचे खूप चांगले मित्र होते आणि काँग्रेसच्या नामदार अध्यक्षांचे गुरू आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती.