'मोदींना पायजमाही घालता येत नसेल तेव्हा, नेहरू-इंदिरांनी देशाचं सैन्य उभारलं होतं'

मोदी त्यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळाबद्दल उत्तरे देऊ शकत नाहीत.

Updated: May 13, 2019, 07:08 PM IST
'मोदींना पायजमाही घालता येत नसेल तेव्हा, नेहरू-इंदिरांनी देशाचं सैन्य उभारलं होतं' title=

भोपाळ: नरेंद्र मोदी यांना पायजमाही घालता येत नव्हता, त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी भारतीय लष्कराची उभारणी केली, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपला लगावला. ते सोमवारी रतलाम येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, मोदी त्यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळाबद्दल उत्तरे देऊ शकत नाहीत. ते कसल्या बाता मारतात? ते देशाच्या सुरक्षेविषयी बोलत असतात. मात्र, ज्या काळात मोदी पँट-पायजमाही घालायला शिकले नव्हते तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी भारताच्या लष्कराची उभारणी केली, अशी झोंबरी टीका कमलनाथ यांनी केली. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांमधील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भ्रष्टाचाराचा आणि शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसने शीख दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा वारंवार उल्लेख केला होता. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दिल्ली आणि पंजाबमध्ये मतदान होणार असल्याने या आरोपांमुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. 

याशिवाय, राजीव गांधी यांनी भारतीय नौदलाच्या आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठीही केल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यावेळी राजीव यांनी आपल्यासोबत परदेशी नागरिकांना युद्धनौकेवर नेऊन देशाच्या सुरक्षेशी खेळ केल्याची टीका मोदी यांनी केली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x