नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने जनधन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जनधन खातेधारक बॅलेन्स चेक करण्यासाठी आपल्या बँकेच्या शाखेत जातात. पण सध्या लॉकडाऊन स्थितीत केवळ बॅलेन्स चेक करण्यासाठी लोकांनी बँकेत जाणं तितकंच सोपं किंवा योग्य नाही. पण आता जनधन खातेधारक केवळ एका मिस कॉलवर जनधन खात्यातील बॅलेन्स तपासू शकतात.
एसबीआयने (SBI) आपल्या खातेधारकांसाठी सुविधा सुरु केली आहे. कोणीही जनधन खातेधारक या 18004253800 किंवा या 1800112211 या क्रमांकावर कॉल करुन आपल्या खात्यातील बॅलेन्स चेक करु शकतो. खातेधारकाला आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवरुन या क्रमांकावर कॉल करावा लागेल. खातेधारक या सुविधेद्वारे एका वेळी पाच ट्रान्झक्शनबाबत माहिती घेऊ शकतो.
त्याशिवाय खातेधारक आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवरुन 9223766666 या क्रमांकावरही कॉल करु शकतो. या क्रमांकावर कॉल करुन खातेधारकाला संपूर्ण माहिती मिळू शकते.
जनधन खातेधारक असूनही जर खातेधारकाचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड नसेल तर 09223488888 या क्रमांकावर मेसेज करुन खातेधारक त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करु शकतो. मेसेज करण्यासाठी खातेधारकाला REG AccountNumber लिहून 09223488888 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (PMJDY)आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सरकार या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये तीन महिन्यांपर्यंत पैसे पाठवणार आहे. पहिली रक्कम 3 एप्रिल रोजी खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आली आहे.