'आम्ही मुंबईवरून भोजपुरी कलाकार पकडून आणलेयत, आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल'

मुंबईसाठी खूप केले आता पूर्व उत्तर प्रदेशसाठीही काहीतरी करा.

Updated: Apr 24, 2019, 04:17 PM IST
'आम्ही मुंबईवरून भोजपुरी कलाकार पकडून आणलेयत, आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल' title=

लखनऊ: यंदाच्या निवडणुकीसाठी आम्ही मुंबईवरून खास दोन भोजपुरी कलाकार पकडून आणले आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते बुधवारी चंदौली येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले की, यंदा उत्तर प्रदेशातून दोन भोजपुरी कलाकार निवडणूक लढवत आहेत. आम्ही त्यांना मुंबईहून जबरदस्तीने पकडून आणले आहे. मुंबईसाठी खूप केले आता पूर्व उत्तर प्रदेशसाठीही काहीतरी करा, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता हे कलाकार संसदेत गेले तर पूर्व उत्तर प्रदेशात फिल्मसिटी होईल. मग याठिकाणीही अनेक कार्यक्रमांची निर्मिती होईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

यंदा भोजपुरी अभिनेता रवी किशन गोरखपूर आणि दिनेश लाल यादव आझमगढ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दिनेश लाल यादव यांच्यासमोर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आव्हान आहे. तर रवी किशन गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. गोरखपूर मतदारसंघ योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते पाचवेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. हे दोन्ही कलाकार मोठ्य़ा फरकाने विजय मिळेल, असा दावा भाजपने केला आहे.