Video Ind vs Aus Stump Mic Virat Kohli to Mohammed Siraj: बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊण्डवर आजपासून बॉक्सिंग डे टेस्ट सुरु झाली आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. सामन्याच्या पहिल्या दिवासापासूनच हा सामना खेळाबरोबरच स्लेजिंग आणि मैदानातील इतर घडामोडींसाठी गाजणार असे संकेत मिळत आहे. नाणेफेक जिंकून यजमानांनी समाधानकारक कामगिरी केली असतानाच आज मैदानात अनेकदा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू अगद्वी त्वेषाने मैदानात उतरले होते. याचदरम्यान विराट कोहलीने भारतीय सहकाऱ्यांना दिलेला सल्ला स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया पदार्पण करणारा 19 वर्षीय सॅम कोस्टास आणि अनुभवी उस्मान ख्वाजा या दोघांनी 19 ओव्हरमध्येच संघाला 89 धावांपर्यंत पोहचवत दमदार सुरुवात करुन दिली. धावफलक 89 वर असतानाच सॅम बाद झाला. आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये सॅमने दमदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन चाहत्यांची मनं जिंकली. अगदी जसप्रीत बुमराहसारख्या अव्वल गोलंदाजालाही त्याने चौकार लगावल्याचं पाहून भारतीय चाहते गोंधळलेले दिसून आले. मात्र त्याचवेळी दुसरीकडे भारतीय खेळाडू आक्रमकपणे विकेट्ससाठी प्रयत्न करत होते. याचदरम्यान विराटने संघ सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अजब सल्ला दिल्याचं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं.
सॅम बाद झाल्यानंतर मार्नस लबूशेन ख्वाजाला साथ देण्यासाठी मैदानात आला. हे दोघे फलंदाजी करत असतानाच गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मार्नस लबूशेनदरम्यान मैदानात बाचाबाची झाली. ही बाचाबाची सुरु असतानाच कोहलीने सिराजला एक सल्ला दिला. सिराज आणि मार्नस लबूशेनमध्ये यापूर्वीच्या सामन्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आजच्या कसोटीमध्ये दोघे त्या तुलनेत जास्त मैत्रीपूर्णपद्धतीने संवाद साधत होते. हे पाहून कोहलीने, "हंसकर नहीं बात करना इनसे" म्हणजेच 'यांच्यासोबत हसत बोलू नकोस' असा सल्ला दिला. स्टार स्पोर्स्टसच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन विराटच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
The stump mic has been kept busy this morning! #AUSvINDOnStar 4th Test, Day 1 LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/hwANCA1qar
— Star Sports (@StarSportsIndia) December 26, 2024
ऑस्ट्रेलियन संघाने पहिला दिवस संपताना 86 ओव्हरमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात 311 धावांपर्यंत मजल मारली आहे. या कसोटी मालिकेमध्ये भारताने पहिली कसोटी जिंकली असून दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळावला. तिसऱ्या कसोटीमधील दोन दिवस पावसामुळे खेळ होऊ न शकल्याने ती अनिर्णित राहिली. त्यामुळेच आता दोन्ही संघांसाठी चौथ्या कसोटीमधील विजय हा अत्यंत महत्त्वाचा असून हा सामना जिंकणारा संघ आघाडीवर जाईल अशी स्थिती आहे.