Wrestlers Protest: मोठी बातमी! बृजभूषण सिंह यांच्या घरी पोलीस दाखल

Wrestlers Protest News: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे (sexual harassmen) आरोप करण्यात आले असून दिल्ली पोलीस (Delhi Police) आज त्यांच्या घऱी दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी यावेळी 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील घरी जाऊन दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 6, 2023, 03:37 PM IST
Wrestlers Protest: मोठी बातमी! बृजभूषण सिंह यांच्या घरी पोलीस दाखल title=

Wrestlers Protest Update: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. कुस्तीगिरांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे (sexual harassmen) आरोप केले असून आंदोलनाचं हत्यार काढलं आहे. बृजभूषण सिंह यांना तात्काळ अटक केली जावी अशी आंदोलक कुस्तीगिरांची मागणी आहे. यादरम्यान, दिल्ली पोलीस (Delhi Police) मंगळवारी बृजभूषण सिंह यांच्या घरी दाखल झाले. पोलीस बृजभूषण सिंह यांच्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील घरी पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी यावेळी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील लैंगिक शोषण आरोपप्रकरणी 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. 

दिल्ली पोलिसांनी यावेळी जबाब नोंदवले आहेत त्यांची नावं, पत्ते आणि ओळखपत्रं जमा करुन घेतली आहेत. पुराव्यासाठी हा डेटा जमा करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी यावेळी बृजभूषण सिंह यांच्या काही समर्थकांचीही चौकशी केली आहे. 

विशेष तपास पथकाने (Special Investigation Team ) बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात आतापर्यंत एकूण 137 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पण पोलिसांनी बृजभूषण सिंह यांची चौकशी केली आहे का हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. 

याआधी 28 एप्रिलला दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवले होते. यामधील एक गुन्हा एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी लहान मुलांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) देणाऱ्या कायद्याचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बृजभूषण सिंह यांच्यावर विविध भारतीय दंड संहिता (IPC) कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये महिलेला तिचा विनयभंग करण्यासाठी मारहाण करणे (354), लैंगिक छळ (354A) आणि पाठलाग (354D) यांचा समाविष्ट आहे. या आरोपात दोन-तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. 

काही तक्रारकर्त्यांनी बृजभूषण सिंह यांनी करिअरमध्ये मदत करण्याचं आश्वासन देत लैंगिक सुख मागितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान बृजभूषण सिंह यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले. एकही आरोप सिद्ध झाला तर मी फासावर लटकेन असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे. 

आंदोलन मागे घेतलेलं नाही - साक्षी मलिक

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नोकरीवर रुजू झाल्याच्या वृत्तासंदर्भात बोलताना आम्ही आंदोलन मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. साक्षी मलिकने ट्वीट करुन आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. "न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे," असं साक्षीने म्हटलं आहे. तर बजरंग पूनियाने "एफआयआर मागे घेण्यात आल्याचं वृत्त खोटं आहे. आमची लढाई सुरु आहे," असं म्हटलं आहे.