800 रुपयांसाठी 9 महिन्यांच्या पोटच्या पोरीला विकलं! तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही थक्क

Women Sold 9 Month Old Baby: या महिलेचा पती अचानक घरी आला तेव्हा त्याला घरी एकच मुलगी दिसली. त्याने याबद्दल पत्नीला विचारलं असता त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. नंतर समोर आलेला खुलासा फारच धक्कादायक होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2023, 04:34 PM IST
800 रुपयांसाठी 9 महिन्यांच्या पोटच्या पोरीला विकलं! तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही थक्क title=
पोलिसांनी या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक केली आहे

Women Sold 9 Month Old Baby: ओडिशामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका आदिवासी महिलेने आर्थिक चणचणीला कंटाळून चक्क आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विकलं आहे. मयूरभंज जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला असून केवळ 800 रुपयांसाठी या महिलेने आपल्या चिमुकलीचा सौदा केला आहे. पोलिसांनी या बाळाची सुटका केली आहे. या प्रकरणामध्ये मुलीची विक्री करणारी आई, तिला विकत घेणारं दांपत्य आणि हा सौदा घडवून आणणाऱ्या मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलीचं योग्य पद्धतीने पालन पोषण करता येत नव्हतं. त्यामुळेच तिने आपल्या मुलीला शेजारच्या गावातील एका जोडप्याला विकण्याचा निर्णय घेतला. 

पती परत आला अन् त्याला घरी एकच मुलगी दिसली

या महिलेचं नाव करामी मुर्मू असल्याची माहिती समोर आली आहे. करामीला एकूण 2 मुली आहेत. त्यापैकीच धाकट्या मुलीला तिने विकलं. या चिमुकलीचं नाव लीजा असं आहे. करामीच्या पतीचं नावं मुशू मुर्मू असं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने मुलीला विकल्याची कल्पनाही मुशूला नव्हती. मुशू हा कुंटुंबाचं संगोपन करता यावं म्हणून तामिळनाडूमध्ये नोकरी करतो. करामी एकटीच तिच्या मुलींबरोबर गावात राहते. बऱ्याच काळापासून पती ओडिशामधील मूळ गावी आला नव्हता. मात्र अचानक तो पत्नीला न सांगता एक दिवस घरी आला. त्यावेळी त्याला घरी एकच मुलगी असल्याचं दिसलं. त्याने अनेकदा पत्नीला छोट्या मुलीसंदर्भात विचारलं. मात्र तिला योग्य उत्तर देता आलं नाही. अखेर त्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. 

मुलींचा ताबा आजीकडे

पोलिसांनी मुशूच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून घेत तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना मुली बेपत्ता होण्यामागे तिची आईच असल्याची माहिती मिळाली. पुराव्यांच्या आधारे आरोपी आईला ताब्यात घेण्यात आलं. अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या महिलेने आपल्याला घरखर्च चालवणं कठीण जात होत म्हणून मुलीला विकल्याचं सांगितलं. तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही थक्क झाले. ज्या दांपत्याला करामीने मुलगी विकली त्यांना एकही मूलं नसल्याने त्यांनी या मुलीला विकत घेतलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी या चिमुकलीला आता बाल विकास समितीच्या देखरेखीखाली तिच्या आजीकडे सोपवलं आहे. थोरल्या मुलीचा ताबाही सध्या आजीकडेच देण्यात आला आहे. तिन्ही आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मुशू हा पुन्हा कामानिमित्त तामिळनाडूला गेला आहे. पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत असून सध्या या तिघांची चौकशी करत आहेत.