गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 25, 2024, 02:22 PM IST
गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज title=
या जोपड्याचं प्रकरण सध्या समोपदेशक हाताळत आहेत

Wife Filed For Divorce: मध्य प्रदेशमध्ये एक फारच विचित्र घटना घडली आहे. येथील एका महिलेने आपल्या पतीपासून घटस्फोट हवा असल्याचा अर्ज केला आहे. बरं हा अर्ज करण्यामागील गोंधळून टाकणारं कारण म्हणजे पतीने गोव्याला घेऊन जाण्याचं आश्वासन देत पत्नीला अयोध्येला नेलं. यामुळेच संतापलेल्या पत्नीनं थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. पत्नीने कौटुंबिक न्यायालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज वाचून न्यायाधिशांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या या पती-पत्नीचं समोपदेशन केलं जात आहे.

परदेशात जायचं होतं पण...

हा सारा प्रकार भोपाळमधील पिपलानी परिसरातील जोडप्याबरोबर घडला आहे. रिलेशनशिपसंदर्भात समोपदेशन करणाऱ्या शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं लग्न मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालं आहे. पती हा माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात इंजीनिअर आहे. पतीला पगारही अगदी उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळेस पतीने आई-वडील वयस्कर आहेत असं म्हणत आपण भारतामध्येच कुठेतरी फिरायला जाऊ असं पत्नीला सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये गोव्याला जाण्यावर सहमती दर्शवली होती. 

अचानक पतीने पत्नीला दिला धक्का

ज्या दिवशी फिरायला जाण्याचं ठरलं त्याच्या एक दिवस आधी पतीने पत्नीला आपण अयोध्या आणि बनारसला फिरायला जातोय असं सांगितलं. आईला देवदर्शन करायचं असल्याने आपण इथे जात असल्याचंही पतीने पत्नीला सांगितलं. त्यावेळेस पत्नी कुटुंबाबरोबर फिरायला गेली. मात्र फिरुन आल्यानंतर या दोघांमध्ये फार मोठं भांडण झालं. दोघांमधील वाद अगदी विकोपाला गेला आणि पत्नीने थेट कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. या प्रकरणामध्ये पतीने आपण जाणून-बुजून काहीही केलेलं नाही असं बाजू मांडताना म्हटलं आहे.

अर्जात काय म्हटलं आहे या महिलेने?

शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने गोव्याला जायचं सांगून अचानक अयोध्येला घेऊन जाणं हे विश्वासघात करण्यासारखं असल्याचा दावा पत्नीने केला आहे. पती माझ्यापेक्षा घरातील इतर व्यक्तींना अधिक वेळ आणि महत्त्व देतो असंही पत्नीने घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं आहे. पतीच्या या अशा वागण्यामुळे आपल्याला लग्नानंतर काही दिवसांमध्येच माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यासारखं वाटू लागल्याचं म्हटलं आहे. सध्या पती आणि पत्नी दोघांचंही समोपदेशन केलं जात आहे. दोघांचं नातं टिकवण्याचा प्रयत्न समोपदेशकांकडून केला जात आहे.