नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान या हाडवैरी असलेल्या देशांचे स्वातंत्र्यदिन नेहमीच चर्चेचा विषय असतो. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. मात्र, यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या भाषणांकडे नजर टाकल्यास याठिकाणीही नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शह दिल्याचे मानले जात आहे.
एकीकडे इम्रान खान यांनी १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात भारतिवरुद्ध चांगलीच आदळआपट केली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना भारताविरुद्ध गरळ ओकायची एकही संधी सोडली नाही. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा उल्लेख करत भारत एवढ्यावरच थांबणार नाही, आता ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरतील. त्यामुळे आता युद्ध झाल्यास त्याला शांत बसून असलेले जग जबाबदार असेल. यावेळी आम्ही तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ, असे इम्रान यांनी भाषणात म्हटले होते.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या भाषणात पाकिस्तानचा समाचार कसा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, यावेळीही मोदींनी धक्कातंत्राचा वापर करत आपल्या ९२ मिनिटांच्या भाषणात एकदाही पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. याविरोधात त्यांनी देशवासियांमसोर विकासाचा सकारात्मक अजेंडा मांडला. त्यामुळे मोदींनी इम्रान खान यांना अनुल्लेखानेच मारल्याची चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध काहीच न बोलूनही मोदींनी बरेच काही साधल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी इम्रान खान यांनी तब्बल ४० मिनिटांचे भाषण केले. त्यांनी संपूर्ण भाषणात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यातच धन्यता मानली.
तर मोदींनी आपल्या भाषणात विकासाचा स्मार्ट अजेंडा जगासमोर मांडला. भारतीय अर्थव्यवस्था भविष्यात पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कशी वाटचाल करेल, भारतामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेससोबत इज ऑफ लिव्हिंगला प्राधान्य दिले जाईल, पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १०० लाख कोटींची गुंतवणूक अशा अनेक सकारात्मक गोष्टी मोदींनी आपल्या भाषणातून मांडल्या.