कोरोना व्हायरस भारतात कुठे-कुठे पोहोचला?

भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता.

Updated: Mar 4, 2020, 03:57 PM IST
कोरोना व्हायरस भारतात कुठे-कुठे पोहोचला? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेला कोरोना व्हायरस आतापर्यंत जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. भारतही या देशांपैकी एक आहे. भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. 

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील केरळमध्ये तीन लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समजलं. त्या तिघांचेही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्या तिघांनाही संपूर्ण इलाजानंतरच रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. हे तिघेही चीनमधून भारतात परतले होते. 

त्यानंतर आणखी तीन प्रकरणं समोर आली. त्यापैकी एक जण दिल्लीत, एक जण तेलंगाणा आणि तिसरा जयपूरमधील असल्याचं बोललं जातंय. तिघांनाही देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्यांच्या तपास रिपोर्टची वाट पाहण्यात येत आहे. 

दिल्लीत आढळलेला रुग्ण इटलीहून भारतात आला आहे. तर तेलंगाणामधील व्यक्ती दुबईहून परतला आहे. दिल्लीत आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आग्र्यामधील सहा जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु त्या सहा लोकांचा अहवाल निगेटिव्ह आलाय.

भारतात आतापर्यंत २५ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यापैकी २३ जणांच्या तपासाचा अहवाल येणं बाकी आहे. 

दिल्लीत कोरोना व्हायरचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, नोएडामध्ये दोन खासगी शाळा पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रसासनाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारोंच्या संख्येत लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी, कोरोना व्हायरसबाबत घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. सरकार पहिल्या दिवसापासूनच व्हायरस न पसरण्यासाठी तयार आहे. तरीही अशाप्रकारची काही प्रकरणं समोर आल्यास त्यांच्यावर पूर्ण उपचार करण्यासाठी व्यवस्था असल्याचं ते म्हणाले.

चीन, सिंगापूर, थायलंड, हॉन्गकॉन्ग, जपान, दक्षिण कोरिया, व्हिऐतनाम, नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, ईराण, इटली या १२ देशातून येणाऱ्या सर्व उड्डाणांतील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांची २१ विमानतळ, १२ प्रमुळ बंदरे, ६५ छोटी बंदरे आणि नेपाळच्या सीमेवरही तपासणी करण्यात येत आहे. 

आतापर्यंत ५,५७,४३१ प्रवाशांची विमानतळांवर आणि १२,४३१ प्रवाशांची छोट्या बंदरांवर तपासणी करण्यात आली आहे. एकून ३२४५ नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३२१७ निगेटिव्ह आले असून पाच नमूने पॉजिटिव्ह आले आहेत. 

भारताच्या आरोग्य मंत्रालयाने चीन, इटली, ईराण, साऊथ कोरिआ, आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केलाय. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आलाय. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.  

कोरोना व्हायरसबाबत तक्रार आणि सूचनांसाठी एक कॉल सेंटर सुरु करण्यात आलं आहे. २४ तास सुरु असणाऱ्या या क्रमांकावर संपर्क 01123978046 साधता येऊ शकतो.