75 KmpH चा वेग, मेन लाइनऐवजी लूप लाइन पकडली, जोरदार धडक, आग अन्... बागमती एक्स्प्रेसबरोबर नक्की घडलं काय?

Mysuru Darbhanga Express Accident: बिहारमधील म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 12, 2024, 11:01 AM IST
75 KmpH चा वेग, मेन लाइनऐवजी लूप लाइन पकडली, जोरदार धडक, आग अन्... बागमती एक्स्प्रेसबरोबर नक्की घडलं काय? title=
Photo Credit: PTI

Mysore Darbhanga Express Accident:  म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेसचा चेन्नईजवळ अपघात झाला. ही एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. हा भीषण ट्रेन अपघात शुक्रवारी सायंकाळी कावराईपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ झाला. ट्रेनचे १२ डब्बे घसरले आहेत.    या अपघातात २० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकी अडकलेल्या प्रवाशांना बसने पोनेरी येथे नेण्यात आले आणि नंतर दोन ईएमयू विशेष गाड्यांद्वारे चेन्नई सेंट्रलला नेण्यात आले. तिकडे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. नंतर हे प्रवासी ४.४५ वाजता  अरक्कोनम, रेनिगुंटा आणि गुडूर मार्गे दरभंगासाठी जाणाऱ्या प्रवासी विशेष ट्रेनमध्ये चढले.

नेमका अपघात कसा झाला? 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये शुक्रवारी ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मुख्य मार्गावर जाण्याऐवजी लूपलाइनमध्ये घुसली. या वेळी तिथे एक मालगाडीला उभी होती. या मालगाडी बागमती एक्स्प्रेस येऊन धडकली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका डब्याला आगही लागली.  

अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू 

रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे की चेन्नई रेल्वे विभागातील या  प्रवासी-माल मालगाडीच्या धडकेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रचार विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी पॅसेंजर ट्रेन उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्यानंतर लगेचच एक व्हिडीओ संदेश जारी केला. या व्हिडीओमध्ये ते बोलताना दिसत आहेत की, "आम्हाला चेन्नई विभागातील कावरपेट्टई स्टेशनवर बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाल्याची माहिती मिळाली. बचाव आणि मदत पथके तात्काळ अपघातस्थळी पोहोचली."

 

11 ऑक्टोबर रोजी 20.27 वाजता तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोनेरी स्टेशन ओलांडल्यानंतर एलएचबी डब्यांसह म्हैसूर दिब्रुगड दरबाबगाह एक्स्प्रेस क्रमांक 12578 या गाडीला पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. परंतु, दक्षिण रेल्वेच्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, "कावराईपेट्टई स्थानकात प्रवेश करताना, ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. दिलेल्या सिग्नलनुसार मुख्य मार्गाकडे जाण्याऐवजी, ट्रेन 75 किमी प्रतितास वेगाने लूपमध्ये गेली. लाइनमध्ये प्रवेश केला आणि लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला एक्स्प्रेस येऊन धडकली. या अपघातात कोच आणि पार्सल व्हॅनमध्ये आग लागली होती. ही आग अग्निशमन दलाने विझवली. आता रेल्वे अधिकारी या घटनेचा तपास सुरू केला आहे.