टेकऑफनंतर 2 तास एअरपोर्टवरच घिरट्या, 140 प्रवासी, इमर्जन्सी अन्... काल रात्री भारतात घडलं थरार नाट्य

Air India Express Flight: हा सारा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. एखाद्या चित्रपटाला साजेसा हा घटनाक्रम सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय असून नेमकं घडलं काय आणि कसं हे जाणून घेऊयात सविस्तरपणे...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 12, 2024, 10:44 AM IST
टेकऑफनंतर 2 तास एअरपोर्टवरच घिरट्या, 140 प्रवासी, इमर्जन्सी अन्... काल रात्री भारतात घडलं थरार नाट्य title=
विमानाचं सुरक्षित लॅण्डींग झालं

Air India Express Flight: तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची विमानतळावर (Trichy Airport) शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. एका विमानाचं हायड्रॉलिक्स निकामी झाल्याने विमानतळावर एकच गोंधळ उडाला. या विमानाने 140 प्रवासी प्रवास करत असतानाच हा प्रकार घडला. विमानाच्या वैमानिकाने विमानतळावरील अधिकऱ्यांना यासंदर्भातील माहिती दिली. विमानातील हायड्रॉलिक यंत्रणा निकामी झाली असून त्यामुळे विमान लॅण्ड करता येणार नाही असं वैमानिकाने ट्रॅफिक कंट्रोलला कळवलं. त्यामुळेच हे विमान विमानतळावर जवळपास दोन तासांहून अधिक काळ घिरट्या घालत होतं. अखेर रात्री 8 वाजून 14 मिनिटांनी विमान सुरक्षितपणे लॅण्ड करण्यात आलं. विमान सुरक्षित लॅण्ड झाल्यानंतर विमानतळावरील सर्वांनीच टाळ्या वाजवून वैमानिकाच्या कौशल्याचं कौतुक केलं.

नक्की घडलं काय?

140 प्रवाशांना घेऊन सायंकाळी 5.43 वाजता त्रिची विमानतळावरुन शारजाहला जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाण केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्रिची विमानतळावरील निर्देशकांनी दिलेल्याम माहितीनुसार, वैमानिकाने टेक ऑफनंतर हायड्रॉलिक निकामी झाल्याचं कळवलं होतं. नागरिक उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, "तिरुचिरापल्लीवरुन शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक आयएक्स 613 सुरक्षितपणे तिरुचिरापल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. डीजीसीए सध्या परिस्थितीची चाचपणी करत आहे. लॅण्डींग गेअर उघडत होता. विमान सामान्य पद्धतीने लॅण्ड करण्यात आलं. विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आलेला."

अनेक पर्यायांचा विचार झाला पण...

त्रिची विमानतळाच्या निर्देशकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान हवेत असतानाच फ्युएल डम्पिंगचा विचार करण्यात आला होता. मात्र विमान रहिवाशी परिसरावर घिरट्या घालत असल्याने हा पर्याय स्वीकारता येणार नव्हता. विमानचं बेली लॅण्डींग करण्याचा विचारही झाला. त्यासाठी विमानतळावर संपूर्ण तयारी करण्यात आलेली. अनेक रुग्णवाहिका आणि मतदकार्यासाठी विशेष टीम विमानतळावर तैनात ठेवण्यात आलेल्या. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने आणि वेळोवेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून योग्य सूचनांच्या मदतीने लॅण्डींग केल्याने सर्व प्रावाशांना सुरक्षित उतरवण्यात यश मिळालं. हायड्रॉलिक सिस्टीम का अपयशी ठरली याचा तपास सुरु आहे. 

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या लॅण्डींगवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याचं समजल्याचा मला आनंद झाला. लॅण्डींग गेअरच्या समस्येबद्दल समजल्यानंतर मी तातडीने अधिकाऱ्यांची फोनवरुनच एक आपत्कालीन बैठक घेतली. त्यांना सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सर्व गोष्टी तयार ठेवण्यास सांगितलं होतं. यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशामन दल आणि आरोग्यविषय तुकड्यांचा मसावेश होता. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रवासी सुरक्षित राहतील यासाठी सर्व काळजी घ्यावी असं सांगितलेलं. सुरक्षित लॅण्डींग केल्याबद्दल वैमानिकाचे आणि चालक दलाचं मी अभिनंदन करतो," असं स्टॅलिन म्हणाले. विमान यशस्वीपणे उतरवल्यानंतर विमानतळाबाहेर पडणाऱ्या वैमानिकांनी पत्रकारांशी कोणताही संवाद साधला नाही.

कोणत्या परिस्थितीमध्ये खराब होते हायड्रॉलिक सिस्टीम?

विमानातील हायड्रॉलिक सिस्टीम एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. उड्डाणासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी याच माध्यमातून नियंत्रित केल्या जातात. यामध्ये लॅण्डींग गेअर्सवरील नियंत्रण, फ्लेक्स मुव्हमेंट, एअरलॉन आणि रडार नियंत्रण यंत्रणांचा समावेश असतो. या सेवा ठप्प झाल्या तर विमानाच्या उड्डाणामध्ये अडचणी निर्माण होतात. यामुळे विमानाची सुरक्षा धोक्यात येते. हायड्रॉलिक सिस्टीम लीकेज, हायड्रॉलिक पंपमधील बिघाड, फ्युएडमधील प्रदूषण, अधिक तापमान, सुट्या भागांना झालेलं नुकसान, सिस्टीम ओव्हरलोड होणे यामुळे खराब होते.