डोसा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. रस्त्यावर लागलेल्या स्टॉलपासून ते मोठ्या हॉटेलापर्यंत अनेक ठिकाणी डोसा हा मेन्यूचा भाग असतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत, अनेकवेळा तो ताटात असतो. त्यात डोसा हा वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जात असल्याने तो सतत खाऊन कंटाळाही येत नाही. साऊथ इंडियन डिश असणारा हा डोसा तयार केला जात असतानाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. दरम्यानं बंगळुरुमधील एका रेस्तराँमध्ये डोसा तयार केला जात असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरुवातीपासूनची प्रक्रिया दाखवण्यात आली असल्याने हा डोसा नेमका कसा तयार केला जातो हे दिसत आहे. यानंतर अनेकांना त्यातील काही गोष्टी खटकल्या असून, नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
@Thefoodiebae या फेसबुक अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये, रेस्तराँमधील खुल्या किचनमध्ये आचारी एका मोठ्या तव्यासमोर उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी ग्राहक मोठ्या संख्येने दिसत आहेत. यानंतर आचारी डोसा बनवण्यास सुरुवात करतो. तव्यावर पाणी शिंपडल्यानंतर खराट्याने तो साफ करतो. नंतर तो डोसा बनवण्यास सुरुवात करतो. या एका तव्यावर 12 डोसा सहज तयार केले जाऊ शकतात.
यानंतर स्वयंपाकी तुपाच्या पाकिटाला लहान छिद्र पाडतो आणि प्रत्येक डोशावर टाकतो. नंतर तो पोडी मसाला देखील पसरवतो. नंतर डोसे केळीच्या पानांच्या ताटातून दिले जातात. ग्राहकांना देण्यापूर्वी त्या चटणी आणि सांबराने भरल्या जातात. "बंगलोरच्या मोस्ट हाय-टेक डोशासाठी तुफान गर्दी," असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे.
व्हिडिओला आतापर्यंत 15 मिलियन व्ह्यूज आणि 111 हजार लाईक्स मिळाले आहेत. यावेळी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तवा पुसण्यासाठी खराट्याचा वापर केल्याने टीका केली आहे. इतरांना डोसा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप/तेल जास्त प्रमाणात आढळले आहे.
एकाने कमेंट करत हा, मोस्ट हाय-टेक तेलकट ह्रदयरोग आजार डोसा असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने यापेक्षा उत्तम ठिकाणं असताना यांना उगाच मोठं केलं जात असल्याचं लिहिलं आहे. तर एका युजरने बंगळुरुत हाय-टेक म्हटलं की लोक लगेच गर्दी करतात, हे एक मार्केटिंग टूल असल्याचं लिहिलं आहे.
एकाने लिहिलं आहे की, 'बंगळुरुतील हाय-टेक डोसा तवा साफ करण्यासाठी खराटा वापरतो. तसंच इतकं तेल वापरुन ग्राहकांना डॉक्टरांकडे पाठवत आहेत. यामध्ये हाय-टेक काहीच नाही'.