'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले

Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.

राजीव कासले | Updated: Sep 7, 2024, 08:14 PM IST
'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले title=

Viral Reels : सोशल मीडियावर सध्या रिल्स बनवण्याची स्पर्धाच लागली आहे. नोकरी-व्यवसाय करण्याऐवजी तरुण पिढीचा सध्या यूट्यूब (YouTube), इन्स्टाग्रामवर (Instagram) रिल्स (Reels) बनवण्याकडे कल वाढत चालला आहे. यूटयूब आणि इन्स्टाग्रामवरुन चांगली कमाई देखील होत आहे. त्यामुळे आपल्या रिल्सला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते केलं जातं. अगदी जीव देण्यापासून जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणीही केली जात आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती मृतदेहाशेजारी बसून चक्क हिंदी गाण्यावर रिल्स बनवताना दिसतोय. व्हिडिओत एक मृतदेह दिसत असून मृतदेहाच्या बाजूला काही महिला रडताना दिसत आहेत. आपला माणूस सोडून गेल्याचं त्यांना दु:ख झालंय. त्याचवेळ मृतदेहाशेजारी एक व्यक्ती बसलेला व्यक्ती दिसत आहे. समोर कोणीतरी मोबाईलवरुन रेकॉर्डिंग करतंय. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु झाल्यानंतर तो व्यक्ती रडण्याची अॅक्टिंग करताना दिसत आहे. तो व्यक्ती मृतदेहाला कधी मिठी मारताना तर कधी पाया पडताना दिसत आहे. व्हिडिओच्या मागे 'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' हे हिंदी गाणं सुरु आहे. मृतदेहाशेजारी बसलेल्या काही महिला या व्यक्तीचे चाळे बघून संतापलेल्याही या व्हिडिओत दिसतायत.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक युजरने म्हटलंय 'आपण कोणत्या समाजात राहातोय, लोकांच्या संवेदनाही मेल्या आहेत? कोणाच्या जाण्याने त्या कुटुंबातील सदस्यांचं किती मोठं नुकसान होतं, पण या व्यक्तीला त्याचं सोयरसुतक नाही. अशा दु:खद प्रसंदी रिल्स बनवण्याचे चाळे करणं किती क्लेशदायक आहे. तर एका युजरने या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे.