भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपल्या संवेदनशीलतेचा परिचय आपल्या कृतीतून देणाऱ्या या माजी मुख्यमंत्र्यांचं सोशल मीडियातून कौतुक होताना दिसतंय. शुक्रवारी आपला ताफा रोखून एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मदत करताना शिवराज सिंह चौहान दिसले. इतकच नाही तर या तरुणाला उचलून एम्बुलन्सपर्यंत पोहचवण्यासाठीही त्यांनी मदत केली. या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडीदीपच्या सलतलापूर पोलीस स्टेशन भागात शुक्रवारी दुपारी एक बाईकस्वार तरुण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. याच दरम्यान तिथून भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा ताफा जात होता. जखमी तरुणावर नजर जाताच शिवराज सिंह यांनी आपला ताफा थांबवत तरुणाकडे धाव घेतील. यामुळे वेळीच या तरुणाला वैद्यकीय मदत मिळाली.
#WATCH: Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injured in an accident on Bhopal-Jait road. pic.twitter.com/YYXH2M1cOv
— ANI (@ANI) August 16, 2019
इतकंच नाही तर त्यांनी जखमी तरुणासोबत कुणी जवळची व्यक्ती आहे का? असाही प्रश्न उपस्थितांना केला. जेव्हा तो एकटाच आहे, असं लक्षात आलं तेव्हा माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझी यायची गरज आहे का?' असाही प्रश्न एम्बुलन्सच्या कर्मचाऱ्यांना विचारला. तसंच एम्बुलन्सच्या ड्रायव्हरलाही वेळेत जखमीला रुग्णालयात पोहचवण्यास सांगितलं.