नवी दिल्ली : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच वायूदलाचे ३० हजार कोटी रुपये लुटले आणि उद्योगपती अनिल अंबानींना दिल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. मोदींनी अनिल अंबानींना दिलेल्या पैशाचा मुद्दा काँग्रेस गेल्या वर्षभरापासून उपस्थित करत आहे. आता त्या संदर्भात अहवालदेखील प्रसिद्ध झालाय. त्यात पंतप्रधान मोदी हे राफेल कराराबाबत फ्रान्स सरकारशी प्रत्यक्षपणे सौदेबाजी करत असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय. करारासंदर्भात पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
#WATCH: Congress President Rahul Gandhi responds to PM Modi's allegation that Congress is weakening the Indian Air Force. pic.twitter.com/SglP51RQKN
— ANI (@ANI) February 8, 2019
गुरुवारी लोकसभेतील भाषणात काँग्रेसप्रणित विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेस सरकारच्या काळात एकही संरक्षण करार दलालीशिवाय झाला नसल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. वायूदल मजबूत व्हावं असं काँग्रेसला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला होता... काँग्रेसचा भ्रष्टाचार उघडकीला आणू शकतील, असे तीन साक्षीदार सरकारनं पकडल्यामुळं काँग्रेस भयभीत झालीय. मोठमोठ्या लोकांच्या मालमत्ता, संपत्ती जप्त होत आहेत, असं सांगत त्यांनी रॉबर्ट वाड्रा यांचं नाव न घेता काँग्रेसवर टीका केली होती... राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली होती. सत्ताभोगामुळं काँग्रेसमध्ये विकृती आल्याचं सांगत काँग्रेसमुक्त भारताचं महात्मा गांधींचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असंही ते म्हणाले. याच मुद्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राहुल गांधी प्रत्यूत्तर देत होते.