Brain Stroke: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. जिममध्येच एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील सिद्धिगीरी परिसरात 32 वर्षांचा तरुण जिममध्ये व्यायाम करत होता. त्याचवेळी अचानक त्यांचे डोके दुखू लागले आणि तो खाली कोसळला. त्यानंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या चेतगंज परिसरात पियरी या भागात राहणारा 32 वर्षीय दीपक गुप्ता हा बॉडि बिल्डर होता. रोज शहरातील एका जिममध्ये तो व्यायामासाठी जात होता. व्यायाम करताना अचानक त्याचे डोके दुखू लागले त्यानंतर तो जमिनीवर बसला आणि डोके पडकून बसला होता. खाली बसला असतानाच तो अचानक जमिनीवर कोसळला आणि तडफडू लागला. दीपक अशा प्रकारे कोसळल्याने आजूबाजूच्या लोकं धावत त्याच्याजवळ पोहोचले. ही सर्व घटना सीसीटीव्हत कैद झाली आहे. त्यानंतर दीपकला लगेचच महमूरगंज परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित केले आहे .
व्यायाम करत असताना दीपकला ब्रेन स्ट्रोक आला होता. हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात, त्यामुळं असं होऊ शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दीपक याच्यामागे त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. दीपकच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.
उन्हाळा वाढल्याने उष्माघातामुळं ब्रेनस्ट्रोक होण्याची शक्यता असते. अशावेळी पाणी जास्त पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच उन्हात शारिरीक कष्टाची कामे न करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच, शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी ताक, दही, लस्सी असे पेय पिण्याचा सल्ला दिला जातो.
ब्रेन स्ट्रॉक म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनी फुटते आणि त्यामुळं ब्लॉकेजमुळं रक्त आणि ऑक्सिजन मेंदूच्या उतींपर्यंत पोहचू शकत नाही. अशावेळी वेळेत उपचार मिळाले नाही तर जीवावर बेतू शकते. ब्रेनस्ट्रॉक होण्याचे मुख्य कारम म्हणजे उच्चरक्तदाब किंवा साखरेची वाढलेली पातळी हे असू शकते.
गरगरणे, भोवळ आल्यासारखे वाटणे किंवा डोके दुखणे ही प्राथमिक लक्षणे असतात. दुसऱ्या बाजूला अवयव जड झाल्यासारखे किंवा बधीर झाल्यासारखे वाटणे किंवा बोलताना काही क्षण उच्चार अस्पष्ट होणे, अशीही लक्षणे असतात.