Covid Vaccine Row: करोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कोव्हिशिल्ड (Covishield) व कोव्हॅक्सिन या व्हॅक्सिनचे दोन- दोन डोस देण्यात आले. सरकारनेही व्हॅक्सिन प्रत्येक नागरिकाने घ्यावी, यासाठी प्रयत्नशील होते. आता कोव्हिड महामारी आणि लॉकडाऊन या सर्व घटनेला दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, अलीकडेच करोनावरील कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनबद्दल एक धक्कादायक दावा समोर आला आहे. लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका आलेल्यांच्या संख्येत वाढ झाली असून टलेटस घटणे किंवा रक्तात गुठळ्या हे धोके ही निर्माण झाले आहेत. ‘कोव्हिशिल्ड’ विकसित करणाऱ्या कंपनीकडूनच ब्रिटनच्या न्यायालयात लशीच्या धोक्याबाबतचे पुरावे दाखल करण्यात आले आहे. आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. (Covishield vaccine case)
कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे साइड इफेक्ट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विशाल तिवारी यांनी एक याचिका दाखल केली आहे. कोर्टाने एम्सच्या डायरेक्टरच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचे एक पॅनेल स्थापन करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायाधीश यांच्या निगराणीखाली कोव्हिशिल्डमुळं निर्माण होणारे धोके आणि साइडइफेक्टची चाचपणी व्हावी, असं देखील याचिकेत म्हटलं आहे.
करोना साथीच्या काळात कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर गंभीर अपंगत्व आलेल्या किंवा मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. . प्लेटलेटस घटणे किंवा रक्तात गुठळ्या हे धोके आणि लस यांचा संबंध असल्याचे ‘अॅस्ट्राझेनेका’ने मान्य केल्याचा दावा याचिकेत केला आहे. भारतात या लशीची निर्मिती पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने केली होती आणि तिच्या १७५ कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या, असे याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, कोव्हिड-१९ वर नियंत्रण मिळवण्यासाठी विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याबरोबरच (थ्रोम्बोसायटोपेनिया सिन्ड्रोम) रक्तात गुठळ्या तयार होण्याचा प्रकार (थ्रोम्बोसिस) काही अत्यंत दुर्मीळ रुग्णांच्या बाबतीत घडू शकतो, अशी कबुली ‘अॅस्ट्राझेनेका’ या ब्रिटनमधील औषध कंपनीने दिली आहे. या नंतर भारतासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबतीत चिंता व्यक्त केली जात आहे.