Uttarakhand Bolero Accident : उत्तराखंडच्या पिथौरागढ (Pithoragarh Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे (Uttarakhand Police) पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.
प्रवाशांनी भरलेली बोलेरो गाडी कोसळून 500 मीटर खोल दरीत कोसळली. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक आणि आयटीबीपीचे जवान घटनास्थळी पोहोचत त्यांनी मदतकार्य सुरु केले. स्थानिक नायब तहसीलदारांनी जाहीर केलेल्या अधिकृत यादीत मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. या अपघातात किशन सिंग, धरम सिंग, कुंदन सिंग, निशा देवी, उमेश सिंग, शंकर सिंग, महेश सिंग, सुंदर सिंग, खुशाल सिंग आणि दान सिंग यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वरच्या शामा येथून भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांची गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चुराडा झाला. अपघातातील मृत हे बागेश्वर तालुक्यातील कपकोट, शामा आणि भानार येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. बोलेरा गाडी खड्ड्यात पडल्याची माहिती तेथून जाणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकांनी सर्वात आधी गावकऱ्यांना दिली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. बागेश्वरच्या शामा येथून पिथौरागढच्या नाचणीकडे येणाऱ्या वाहनाच्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद बातमी मिळाली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली आहे, मृतांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं आहे.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami condoles the death of 9 people in Pithoragarh accident https://t.co/ySi1pFl2aS pic.twitter.com/HYaKphFiNy
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 22, 2023
दरम्यान, या अपघातानंतर बागेश्वर, कपकोट येथील माजी आमदार व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. बागेश्वरच्या भानार गावातील ग्रामस्थ 5 वाहनांसह होकरा देवी मंदिर मुनसियारीकडे निघाले होते. त्यातील एका गाडीला अपघात झाला. खोली जास्त असल्यामुळे आतापर्यंत फक्त 5 मृतदेह येथून काढण्यात आले आहेत. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.