IRS kuldeep Dvivedi Success Story: दरवर्षी लाखो तरुण देशातील सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी परीक्षा देतात. यातील काहीजणांना यश मिळतं. यामागे त्यांची अफाट मेहनत असते. दरम्यान गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या उमेदवाराला जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याच जास्त कौतुक केलं जात. बालपणापासून अनेक सुखसोयींना वचिंत राहिलेले विद्यार्थी अभ्यासावरुन आपले लक्ष हटवत नाहीत आणि कठीण वाटणाऱ्या यशाला गवसणी घालतात ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. अशीच एका यशाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आयआरएस अधिकारी कुलदीप द्वीवेदी यांची ही कहाणी आहे. त्यांनी 2015 मध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रॅंकिंग 242 मिळवून यूपीएससीमध्ये यश मिळवले.
कुलदीप द्विवेदी हे उत्तर प्रदेशच्या निगोह येथील छोटेसे गाव शेखपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सुर्यकांत द्विवेदी हे लखनौ विद्यापीठात सुरक्षा गार्ड म्हणून नोकरी करायचे. त्यांना 1100 रुपये इतका साधारण पगार मिळायचा. घरामध्ये कमावणारेदेखील ते एकमेव विद्यार्थी होते.
कुलदीप यांचे वडील सुर्यकांत यांचे शिक्षण बारावीपर्यंत तर आई मंजूचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते. पण आपल्याला गरिबीतून बाहेर पडायचे असेल कर शिक्षण महत्वाचे आहे, हे द्विवेदी परिवाराला माहिती होते. त्यामुळे त्यांनी कधीच आपला मुलगा कुलदीपला शिक्षणापासून दूर केले नाही.
4 भावाबहिणींमध्ये कुलदीप हे शिक्षणात हुशार होते. छोट्या वयापासून आर्थिक चणचण पाहिल्यानंतर आयुष्यात खूप मेहनत घ्यायची आणि मोठी स्वप्न पाहून ती सत्यात उतरवायची असे कुलदीपने ठरवले होते. आमच्या नातेवाईकांची मुले इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकायची पण आपल्याकडे जिद्द असूनही तसे शिक्षण मिळत नाही, याची खंत कुलदीपला वाटायची. पण आमचे आईवडिलदेखील आमच्यासाठी बेस्ट असे देत होते, अशी प्रतिक्रिया कुलदीपची बहीण स्वातीने एका मुलाखतीत दिली होती.
कुलदीप यांनी 2009 मध्ये इलाबाद विद्यापीठात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर 2011 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. पण घरची आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येत होती. कुलदीप यांच्याकडे त्यावेळी कोचिंगचा खर्च भागवण्याइतकेदेखील पैसे नव्हते. त्यामुळे त्याने मित्रांकडून पुस्तके उधारी घेतली. आणि सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. 2015 मध्ये कुलदीप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पहिला अटेम्प्ट दिला. यात त्यांना ऑल इंडिया रॅंकींग 242 प्राप्त झाला. कुलदीप यांनी यूपीएससीमध्ये यश मिळवले होते. सध्या ते आयआरएस म्हणून जबाबदारी संभाळत आहेत.