काम पूर्ण होत नाही तोवर 'No टॉयलेट, No वॉटर ब्रेक'; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना क्रूर अट

Employees Policy : नोकरीच्या ठिकाणी संस्थांकडून कर्मचाऱ्यांप्रतीची माणुसकी संपत चाललीये का? कर्मचाऱ्यांना यंत्राप्रमाणं वागवण्याचं हे सत्र कधी थांबणार?   

सायली पाटील | Updated: Jun 14, 2024, 01:29 PM IST
काम पूर्ण होत नाही तोवर 'No टॉयलेट, No वॉटर ब्रेक'; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना क्रूर अट title=
amazon cruel work policy for employees no toilet no water break

Employees Policy : Employment Rule किंवा तत्सम कायद्यामध्ये आखून दिलेल्या अनेक नियमांचं पालन बहुतांश संस्थांमध्ये केलं जात नाही, ही सध्याची निराशाजनक परिस्थिती. कॉर्पोरेट क्षेत्रातील एखादी मोठी कंपनी असो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीची लहानशी शाखा असो, सगळ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून अधिकाधिक काम कसं करून घेता येईल यावर भर दिला जातो. या साऱ्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिताचा मात्र तसुभरही विचार होताना दिसत नाही. 

कितीही नाकारलं तरीही कमीजास्त प्रमाणात अनेक कंपन्यांमध्ये हे असंच चित्र पाहायला मिळतं. अॅमेझॉन ही ई कॉमर्स कंपनीही यास अपवाद नाही. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अॅमेझॉन कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षीय कर्मचाऱ्यापुढं कंपनीनं अजब अटी ठेवल्या. 

30 मिनिटांच्या टी ब्रेकनंतर कंपनीनं त्यांना एक शपथ घ्यायला लावली. ही शपथ म्हणजे जोपर्यंत 6 ट्रकमधून सामान उतरवलं जात नाही, तोपर्यंत आपण पाणी पिणार नाही, टॉयलेटलाही जाणार नाही... एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या बातमीनुसार हरियाणातील मानेसर स्थित अॅमेझॉनच्या 5 पैकी एका वेअरहाऊसमध्ये ही घटना घडली. 

घडलेल्या प्रकारावर माध्यमांशी संवाद साधताना त्या कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही कोणत्याही विश्रांतीशिवास काम केलं, तरीही अधिकृतरित्या आम्हाला जेवण आणि चहासाठी 30 मिनिटांची विश्रांती आहे. एका दिवसात आम्ही 4 ट्रकमधून सामान उतरवूच शकत नाही.' आपल्यासोबत घडलेला हा प्रकार सांगताना दोन दिवसांपूर्वीच कामात सुधारणा आणण्यासाठी आणि लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही पाणी किंवा प्रसाधनगृहात जाण्यासाठीही break घेणार नाही, अशी शपथ घेतल्याचं सांगितलं. 

आपल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सतत कोणी शौचालयात वेळ घालवतंय का, इथपासून कोणी वायफळ गोष्टी करत नाही ना इथपर्यंत लक्ष ठेवलं जात असल्याचा आरोप करत, या अशा वागणुकीमुळं इथं काम करणारा महिला वर्ग सर्वाधिक प्रभावित झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या वेअरहाऊसमध्ये भर उन्हात उभे असणाऱ्या ट्रकमधून सामान उतरवण्याचं काम करणाऱ्या महिला अधिक थकतात अशीही माहिती यावेळी समोर आली. आठवड्यातून 5 दिवस काम असणाऱ्या या वेअरहाऊसमध्ये 10 तास काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 10,088 रुपये इतकं मासिक वेतन दिलं जातं. 

हेसुद्धा वाचा : 'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज

कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दर दिवशी निर्धारित लक्ष्याचा आकडा दिला जातो. कामाचा भाग म्हणून या कर्मचाऱ्यांना शपथ देत सातत्यानं कामाचं गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळं अनेक कर्मचारी दडपणाखालीही येतात. 

दरम्यान, हे प्रकरण इतक्या गंभीर वळणावर आलेलं असताना अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांकडून सदर प्रकरणी आपण, कामासंदर्भात अशी कोणतीही अट घालत नसल्याचं म्हणत या संदर्भात तपास सुरु असल्याचं स्पष्ट केलं. अशा कोणत्याही घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यास कंपनीकडून कारवाईची पावलं उचलली जातील, असंही प्रवक्त्यांनी सांगितलं.