करोना लस घेणाऱ्यांचा डेटा लीक झाल्यानंतर मोदी सरकारचं स्पष्टीकरण, म्हणाले "CoWIN अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये..."

Covid Data Leak: केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी करोना लस घेणाऱ्या डेटा लीक (Data Leak) झाल्याचा दावा होताच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT Ministry) परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचं सांगितलं आहे. तसंच आढावा घेतल्यानंतर CoWIN अ‍ॅप किंवा डेटा थेट लीक झाला नसल्याचा दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2023, 06:39 PM IST
करोना लस घेणाऱ्यांचा डेटा लीक झाल्यानंतर मोदी सरकारचं स्पष्टीकरण, म्हणाले "CoWIN अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये..." title=

Covid Data Leak: तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या CoWIN पोर्टलचा डेटा लीक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यादरम्यान, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंत्रालयाने तात्काळ दाव्यांची पडताळणी केली असून CoWIN अ‍ॅप किंवा डेटा थेट लीक झाला नसल्याची माहिती दिली आहे. 

मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी CoWIN पोर्टलवरुन करोना लस घेणाऱ्या नागरिकांचे मोबाइल नंबर, आधार नंबर, पासपोर्ट नंबर, मतदान ओळखपत्र, कुटुंबाची माहिती इत्यादी माहिती लीक झाली असून, सहजपणे उपलब्ध आहे असल्याचा आरोप केला आहे. 

या दाव्यावर उत्तर देताना राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट केलं आहे की, टेलिग्राम बोटवर मोबाइल नंबर टाकला असता CoWIN अ‍ॅपवरील माहिती देत आहे. "डेटाबेसमधून बॉटद्वारे डेटा ऍक्सेस केला जात आहे, जो पूर्वी चोरी केलेल्या/चोरी केलेल्या डेटाने भरलेला दिसत आहे," असं केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत. 

चंद्रशेखर यांनी असंही सांगितलं आहे की, राष्ट्रीय डेटा प्रशासन धोरणाला अंतिम रूप देण्यात आलं आहे. हे धोरण सर्व सरकारी प्लॅटफॉर्मवर डेटा जमा करणं, प्रवेश आणि सुरक्षा मानकांची एक समान नियमावली तयार करणार आहे.

डेटा लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारी सूत्रांनी दावा केली आहे की, करोना लसीकरणाची माहिती गोळा करणारं CoWIN पोर्टल कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती जमा करत नाही. पोर्टल केवळ दोन्ही लसी आणि बूस्टर डोस घेतल्याची तारीख घेतं. 

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. लीक झालेला डेटा CoWIN किंवा इतर काही अॅपद्वारे लीक झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. 

आरोप काय आहे?

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्विटरला एकामागोमाग एक अनेक ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "धक्कादायक! मोदी सरकारचा मोठा डेटा लीक झाला आहे. करोना लस घेताना नागरिकांनी दिलेली माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. यामध्ये त्यांचे मोबाइल नंबर, आधार नंबर, पासपोर्ट नंबर, मतदान ओळखपत्र, कुटुंबाची माहिती इत्यादी गोष्टी आहेत. ही सर्व माहिती लीक झाली असून, सहजपणे उपलब्ध आहे".

साकेत गोखले यांनी आरोपी करताना सोबत ज्यांची माहिती लीक झाली आहे त्याचे फोटो जोडले आहेत. यामध्ये विरोधी पक्षातील खासदार, पत्रकार दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रियन, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश, के सी वेणुगोपल, राज्यसभेचे उपसभापती हरिबंश नारायण सिंग, राज्यसभा खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनू सिंघवी, संजय राऊत यांचा यात समावेश आहे. 

तसंच काही वरिष्ठ पत्रकारांचाही डेटा लीक झाला आहे. साकेत गोखले यांनी ट्वीटमध्ये जोडलेल्या स्क्रीनशॉटमध्ये राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राहुल शिवशंकर यांची नावं दिसत आहेत. "करोना लस घेतलेल्या अक्षरश: प्रत्येक भारतीय नागरिकाची माहिती सहजपणे या लीक डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे," असा दावा साकेत गोखले यांनी केला आहे.