'मोदी देवांचे देव! हा देव..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'रोज हिंदू-मुसलमानांची भांडणे लावायची आणि..'

Uddhav Thackeray Gorup On PM Modi Dishonesty: "मोदींनी सार्वजनिक उपक्रमांची तर विक्रीच केली. हे सर्व सार्वजनिक उपक्रम पंडित नेहरूंच्या काळात निर्माण झाले. तरीही मोदी त्यांच्या भाषणात नेहरूंना अपराधी ठरवतात.", असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 24, 2024, 07:52 AM IST
'मोदी देवांचे देव! हा देव..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'रोज हिंदू-मुसलमानांची भांडणे लावायची आणि..' title=
ठाकरे गटाची मोदींवर टीका

Uddhav Thackeray Gorup On PM Modi Dishonesty: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कालावधीत देश अधिक अप्रामाणिक झाल्याची टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. जगातील 180 सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांची यादी पाहिली तर प्रामाणिक देशांच्या यादीत भारताचे स्थान कायम घसरलेलेच असते. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यामध्ये स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, जर्मनी, लक्झेंबर्ग, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, जपान, भूतान, तैवान, दक्षिण कोरियासारख्या देशांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. प्रामाणिक देशांच्या यादीत भारत शोधावा लागतो आणि तो सर्वात भ्रष्ट, अप्रामाणिक म्हणून गणला जातो, हे दुःखदायकच आहे. जो देश स्वतःला हिंदुत्ववादी मानतो व ज्या देशात महाभारत, रामायणासारखी युद्धे सत्य व धर्मरक्षणासाठी झाली तो देश आज खोटारडा किंवा अप्रामाणिक ठरावा ही वेदना आहेच, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

प्रामाणिकपणा कसा टिकेल

"भारतात पैशांची कमतरता नाही, पण देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे, असा सुविचार भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. गडकरी त्यांची परखड मते नेहमीच मांडत असतात. मतदानाचा अंतिम टप्पा सुरू असताना गडकरी यांनी देशातील प्रामाणिकपणात भेसळ असल्याचे मत व्यक्त करावे हे आश्चर्यकारक नसून ठरवून केलेले विधान आहे. मुळात लोकसभा निवडणुकाच प्रामाणिकपणे होत आहेत की नाहीत, याबाबतच लोकांच्या मनात शंका आहेत. मोदी व भाजप यांनी आतापर्यंतच्या सर्व निवडणुका अत्यंत अप्रामाणिक पद्धतीने जिंकल्या व त्यासाठी देशातील निवडणूक आयोगास वेठीस धरले. त्यामुळे प्रामाणिकपणाची गंगोत्री भ्रष्ट करण्याचे काम गेल्या दहा वर्षांत प्रामुख्याने झाले. ज्या देशाचा पंतप्रधान रोज खोटे बोलतो, अप्रामाणिकपणाचे आदर्श निर्माण करतो आणि त्याच्या अप्रामाणिकतेवर टाळ्या वाजवणाऱ्या अंधभक्तांच्या झुंडी निर्माण करून ठेवतो, तेथे प्रामाणिकपणा कसा टिकेल?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

 नेतृत्वाचा अप्रामाणिकपणा संपूर्ण देशाला अप्रामाणिक बनवतो

"गेल्या दहा वर्षांत देश अधिक अप्रामाणिक बनला आहे व त्यास भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे. निवडणूक रोखे घोटाळ्यात भाजपने किमान 10,000 कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने कमावले व त्याच पैशांवर ते निवडणुका लढत आहेत. तरीही आपणच कसे प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचे आहोत, असा गोंधळ मोदी घालत आहेत. मोदी यांनी अदानींसारख्या आपल्या दोस्तांना अर्धा देश विकला व त्यासाठी नियम, कायदे बदलले. सार्वजनिक उपक्रमांची तर विक्रीच केली. हे सर्व सार्वजनिक उपक्रम पंडित नेहरूंच्या काळात निर्माण झाले. तरीही मोदी त्यांच्या भाषणात नेहरूंना अपराधी ठरवतात. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या लुटमारीवर ते बोलत नाहीत. नेतृत्वाचा हाच अप्रामाणिकपणा संपूर्ण देशाला अप्रामाणिक बनवत असतो," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

मोदी देवांचे देव

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापर्यंत भाजपचे पालनपोषण केले. संघाचे प्रचारक भाजप सत्तेत यावा यासाठी राबले. संघामुळे भाजपास सत्ता मिळाली ती काय देश मोदींच्या उद्योगपती मित्रांना विकण्यासाठी? पण आता भाजपचे अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी जाहीर केले की, संघाची गरज आमच्यादृष्टीने संपली असून आमचे आम्ही बघू. हा एकप्रकारे अप्रामाणिकपणाच आहे. कारण भाजपास वाटते, देशातील सर्व लोक हे मर्त्य मानव आहेत व मोदी हे अजरामर देव आहेत. भाजपचे एक पुढारी संबित पात्रा यांनी तर असे सांगून टाकले की, ‘पुरीचे भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत.’ म्हणजे मोदी हे देवांचे देव आहेत. आपण देवच आहोत. अवतारी पुरुष आहोत व आपल्या हातात सुदर्शन चक्र असल्याचे भास स्वतः मोदींना होत असतात. मोदी म्हणतात की, मला परमात्म्यानेच पाठवले आहे. माझ्याकडे असलेली ऊर्जा बायोलॉजीकल शरीराने येऊ शकत नाही. मी कोणीच नाही. मी केवळ एक इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून मी जे करत आहे ते देवच माझ्याकडून करून घेत आहे. म्हणजे देवाने मला पृथ्वीवर जगाच्या कल्याणासाठी पाठवले असल्याचा ‘भपका’ पंतप्रधान मोदी मारतात. पण या देवाच्या देवाने अवतार घेऊन भारत देशाची वाट दहा वर्षांत लावली त्याचे काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

मोदी नावाचा देव वीस हजार कोटींच्या विमानातून व पन्नास कोटींच्या गाडीतून फिरतो

"85 कोटी लोकांना रोजगार नसल्याने त्यांना माणसी पाच किलो धान्य देणे ही एकप्रकारे गुलामीच आहे. देवांचे देव ही गुलामी सहन करतात. लोकांना रोजगार नाही, देवांच्या देवाने गरिबी दूर करण्याची आकाशवाणी केली होती ती हवेतच विरली. देव प्रदेशातील लडाख, अरुणाचल येथे लाल राक्षसांच्या फौजा घुसल्या व देव सेना त्यावर काहीच बोलत नाही. देवांचे देव संविधान, राज्यघटना पाळत नाहीत व चित्रगुप्ताची वही-लेखणी आपल्या हातात घेऊन आपल्या विरोधकांचे हिशेब खोटेपणाने लिहून त्यांना सरळ तुरुंगात ढकलत आहेत. अप्रामाणिक लोकांना वश करून, धमक्या देऊन त्यांनी स्वतःची राज्ये स्थापली व शिवसेनेसारख्या धर्मरक्षक संघटनांवर हल्ले करून आपण राक्षसी पद्धतीने कारभार करीत असल्याचे दाखवून दिले. रोज हिंदू-मुसलमानांत भांडणे लावायची आणि दुसऱ्या दिवशी मुसलमानांविषयी आपल्या मनात प्रेम असल्याचे खोटे सांगायचे. हा अप्रामाणिकपणाचा कळस आहे. मोदी नावाचा देव पंधरा लाखांचा सुट घालतो, रोज दहा वेळा कपडे बदलतो. वीस हजार कोटींच्या विमानातून व पन्नास कोटींच्या गाडीतून फिरतो. हे प्रामाणिकपणाचे लक्षण नक्कीच नाही," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

पुणे अपघाताचा संदर्भ

"पुण्याच्या रस्त्यावर एका मद्यधुंद तरुणाने तरुण-तरुणीस त्याच्या भरधाव गाडीने उडवले. त्या मद्यधुंद तरुणास वाचवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे सँपल बदलले व अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात गेले. एका अप्रामाणिक व्यक्तीस वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट व अप्रामाणिक करण्याचे उद्योग मोदींच्या अमृत काळात वाढले. कारण आपले कोण काय बिघडवणार? ही मस्तवाल वृत्ती पोसली जात आहे," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

विष्णूच्या तोतया अवतारांना..

"देशातले सर्व भ्रष्ट व अप्रामाणिक लोक मोदी यांनी त्यांच्या घरात घेतले आहेत. आपल्याला परमत्म्यानेच पाठविले आहे. असे मोदी म्हणतात. पण मोदी काळात देशातले देवत्वच संपून गेले. धर्म भ्रष्ट झाला, सत्य निस्तेज झाले. विश्वासघाताचा बोलबाला वाढला. घराघरांत भांडणे व कलह लावून मोदी नावाचे अवतारी पुरुष टाळ वाजवीत राहिले. पैसा हीच देशातील काही लोकांची ताकद बनली व त्या पैसेवाल्यांच्या ताकदीवर मोदी यांना देवत्व बहाल करण्याची चढाओढ लागली. देशात पैसा आहे, पण प्रामाणिकपणा नष्ट झाल्याची खंत नितीन गडकरींसारखे नेते व्यक्त करतात. रावणाने व कंसाने प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकले व राज्य केले. तरीही रावण-कंसाचा वध झालाच. कारण सत्य मरत नाही. भारतातही सत्य मरणार नाही. विष्णूच्या तोतया अवतारांना याची प्रचीती 4 जूननंतर येईल. भारत व सत्य याचे अतूट नाते आहे. प्रामाणिकता ही भारताची ध्वजा आहे. ती फडकतच राहील," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.