70-year-old womans house gets electricity connection : आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'स्वदेस' (Swades Movie) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही. पण, त्याच्या या चित्रपटानं एक असा प्रेक्षकवर्ग मिळवला ज्यानं खऱ्या अर्थानं देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्या समस्यांवर विचार करण्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. चित्रपटातील प्रत्येक दृश्यानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. असंच एक दृश्य म्हणजे, 'बिजली....' असं म्हणत पहिल्यांदाच घरात वीजेचा दिवा लागल्याचा अनुभव घेणाऱ्या आणि हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या एक आजी. हे दृश्य पाहताना अनेकांच्याच अंगावर काटा उभा राहिला. (Trending Video News )
'स्वदेस'मधील याच दृश्याची पुनरावृत्ती करणारी अशीच एक घटा प्रत्यक्षात घडली आणि तो व्हिडीओ पाहून संपूर्ण देशच भावनिक झाला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, तो मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे.
महिला आयपीएस अधिकारी अनुक्रिती शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'नूरजहाँ काकूंच्या घरी वीज आणणं जणू त्यांचं आयुष्यच प्रकाशमान करून देण्यासारखं वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मन सुखावणारा होता', असं कॅप्शन अनुक्रिती यांनी लिहिलं आणि ते क्षण मांडताना आपल्यासाठी हा 'स्वदेस'चाच क्षण होता असंही सांगितलं.
देश स्वातंत्र्य होऊनही सत्तर वर्षांहून अधिकचा काळ ओलांडला पण, आजही काही नागरिकांपर्यंत प्राथमिक सुखसोयीसुद्धा पोहोचलेल्या नाहीत. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील नूर जहाँ या 70 वर्षीय आजीसुद्धा त्यातीलच एक. ज्यांच्या मदतीसाठी थेट प्रशासकिय महिला अधिकारी धावल्या आणि या आजीबाईंचं जगणं खऱ्या अर्थानं प्रकाशमान केलं.
अंधारलेल्या घरात पहिल्यांदाच वीजेचा दिवा लागलेला पाहून नूर जहाँ यांनाही प्रचंड आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहताना दररोज वीजेचा वापर करणारी मंडळीही सुखावली. जगण्याच्या लहानसहान गोष्टीसुद्धा परमानंद देऊन जातात याचीच प्रचिती या व्हिडीओमुळं आली.
Swades moment of my life Getting electricity connection to Noorjahan aunty's house literally felt lyk bringing light into her life. The smile on her face ws immensely satisfying.Thank u SHO Jitendra ji & the entire team 4 all da support #uppcares @Uppolice @bulandshahrpol pic.twitter.com/3crLAeh1xv
— Anukriti Sharma, IPS (@ipsanukriti14) June 26, 2023
Smiles pic.twitter.com/DaKrElVW6R
— Anukriti Sharma, IPS (@ipsanukriti14) June 26, 2023
बुलंदशहरमध्ये आणखी एक सुरेख दृश्य पाहायला मिळालं जिथं पोलीस यंत्रणेत सेवेत असणाऱ्या मंडळींनी नूर जहाँ यांच्या घरात वीज येण्याचा आनंद गोडाचे पदार्थ वाटून व्यक्त केला. यावेळी त्या आजीबाई आणि अर्थात त्यांच्या घरात वीज आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकारी, त्यांची संपूर्ण टीम कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नव्हती, किंबहुना हेच खऱ्या आयुष्यातील सेलिब्रिटी ठरले असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.