Job News : कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळी मुलाखतीसाठी जाण्याची वेळ येते तेव्हा काही गोष्टींसंदर्भात होणारी चर्चा अतिशय महत्त्वाची असते. पगार, नोकरीच्या ठिकाणी मिळणारं पद आणि कामाचं स्वरुप याच त्या महत्त्वाच्या चर्चा. अनेकदा संस्था चांगली असते, पदही चांगलं असतं पण सगळ्या गोष्टी अडतात त्या म्हणजे एकाच मुद्द्यावर ते म्हणजे, 'तुम्ही पगार किती घेणार?' या प्रश्नावर.
इच्छुक उमेदवार कितीही शिकलेला असो, त्याचा अनुभव कितीही असो, पण तो उमेदवार पगार किती मागतो हा एखाद्या संस्थेपुढं उभा राहिलेला महत्त्वाचा प्रश्न असतो. थोडक्यात एखादा उमेदवार किती कमालीनं त्याच्या अपेक्षेनुसार पगाराची मागणी करण्यात यशस्वी ठरतो आणि संस्थेलाही त्याचं महत्त्वं कितपत पटतं यावरच सर्वांचं लक्ष असतं. पण, आता एका संस्थेनं मात्र प्रशंसनीय पाऊल उचललं असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या कंपनीच्या CEO नंच आपल्या इथं पगारावरील चर्चा पूर्णपणे बंद केल्याचं सांगितलं आहे. आपल्या कंपनीमध्ये उमेदवार जितका पगार मागतो तितका पगार त्याला दिला जातो असं या सीईओनं स्पष्ट सांगितलं आहे.
बंगळुरूच्या जोको कंपनीच्या सहसंस्थापक आणि सीईओपदी असणाऱ्या अर्जुन वी केनं लिंक्डइनवर लिहिलंय, मी आतापर्यंत माझ्या टीममध्ये 18 जणांना नोकरीवर ठेवलं असून, उत्तमोत्तम कर्मचाऱ्यांना कसं निवडावं हे मला चांगलं ठाऊक आहे, असं सांगत त्यानं पगाराच्या मुद्द्यावर महत्त्वाची बाब स्पष्ट केली.
आम्ही पगारावर बोलतच नाही. ते (उमेदवार) जितका पगार मागतात तितका पगार आम्ही त्यांना देतो, वर्षभरात पगारवाढही करतो असं स्पष्ट करत अर्जुननं यामागची काही कारणंही स्पष्ट केली. पगारासंदर्भातील या भूमिकेमुळं संस्था आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचं नातं तयार होतं. कर्मचाऱ्यांच्या कौशल्यासह त्यांच्या अनुभवाला योग्य न्याय मिळत असल्याचं स्पष्ट होतं. कामाच्या ठिकाणी चालढकल करण्याचा प्रश्नच इथं उदभवत नाही आणि पगाराच्या मुद्द्यांवरून कोणताही असंतोष पाहायला मिळत नाही, हीच ती कारणं. सोशल मीडियावर सध्या हा सीईओ आणि त्यानं केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय असून या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा अनेकांनीच व्यक्त केली आहे.