Travel Last Village in india : विविधतेनं नटलेल्या भारतामध्ये काही भाग असेही आहेत जे खऱ्या अर्थानं तुमची परीक्षा घेतात. असंच एक ठिकाण देशाच्या एका टोकाशी असून तिथं चक्क शत्रूचा कडक पहारा असतो. हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलं तरीही तिथं सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जात नाही. थोडक्यात लष्कराच्या नजरेखालीच या गावात पोहोचता येतं.
Google Map लावून या गावात पोहोचण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक इशाराच. कारण, इथं पोहोचताना एके ठिकाणी हे गुगल मॅपही तुमची साथ सोडतं. या गावाचं नाव आहे थांग.
POK (पाकव्याप्त काश्मीर) आधी भारताच्या बाजूच्या शेवटच्या गावाबद्दल अनेकदा बोललं गेलं असून तुर्तुकचा सातत्यानं उल्लेख होतो. पण, तुर्तुक नव्हे, तर पाकव्याप्त काश्मीरच्या आधी भारताची सीमा थांबते ती म्हणजे थांग नावाच्या गावाजवळ. या गावात पोहोचतानाच तुम्ही शत्रूच्या नजरेखाली आहात असं सुचित करणारे फलक इथं दिसतात. लडाखमधील हे गाव म्हणजे निसर्गाचा अद्भभूत आविष्कार आणि बरंच काही...
लडाखचा विचार केला की आपल्याला हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगा, ताकदीनं वाहणाऱ्या नद्या आणि लांब, नागमोडी वळणं असणाऱ्या डोंगरवाटा डोळ्यासमोर येतात. अशाच वाटांवरून नुब्रा प्रदेशातून या गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता पुढे जातो. काही वर्षांपूर्वी प्रवेश निषिद्ध असणाऱ्या या गावामध्ये आता पर्यटकांना प्रवेश दिला जातो. तुर्तुक आणि थांगसारखी गावं, तेथील शेती, घरं आणि अवघ्या 2 किमी अंतरावर असणारे पाकिस्तान लष्कराचे रक्षक पोस्ट पाहण्याची संधी मिळते. 1971 च्या युद्धापूर्वी पाकिस्तानचा भाग असणारं हे गाव सध्या भारतीय हद्दीत असून इथं बाल्टी समुदायाचा प्रभाव आढळतो.
भारताच्या हद्दीमध्ये असणाऱ्या या गावातील अनेक कुटुंबांचे नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये असून देशांमधील सीमांमुळं ते फक्त एकमेकांना पाहू शकतात. हल्ली इथं लष्कर आणि गावकऱ्यांनी पर्यटकांना भेट देण्यासाठी काही ठिकाणं तयार केली असून तिथून दुर्बिणीच्या सहाय्यानं सहजपणे LOC (नियंत्रण रेषा), पाकिस्तानी पोस्ट आणि भारतीय सैन्याची गस्त घालण्यासाठी उभारण्यात आलेली पोस्ट पाहता येतात. काय मग, तुम्ही कधी निघताय हे गाव पाहायला?