सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांना 'अच्छे दिन'; ग्राहकांनाही मिळणार मोठा दिलासा

Tomato Price : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत 200 रुपये किलोने विकला जात आहे. याच दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांनाही मोठा फायदा होणार आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 13, 2023, 08:05 AM IST
सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांना 'अच्छे दिन'; ग्राहकांनाही मिळणार मोठा दिलासा title=

Tomato Price : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अचानक वाढलेल्या टोमॅटोच्या (Tomato) दराने लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. देशातील बहुतांश भागात टोमॅटोचे भाव 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटो उत्पादनात चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. असे असतानाही देशात टोमॅटोचा भाव अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबईच्या बरोबरीने आहे. मात्र आता टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे.

केंद्र सरकारने बुधवारी नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे दोन्ही विभाग आता टोमॅटोच्या पुरवठ्यासाठी मोठ्या केंद्रांवर एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात वाटप करतील. या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोची विक्री केली जाणार आहे. दरम्यान यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

बदलेल्या हवामानामुळे केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बाजारपेठेत टोमॅटो मुख्यतः महाराष्ट्रातून विशेषतः सातारा, नारायणगाव आणि नाशिक येथून पुरवठा केला जातो. दिल्ली-एनसीआरमध्ये बहुतेक टोमॅटोचा पुरवठा हिमाचल प्रदेशातून येतो आणि त्यातील काही कर्नाटकातील कोलारमधून येतो. नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन टोमॅटो पिकाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. यासोबतच ऑगस्टमध्ये नारायणगाव भागातून अतिरिक्त पुरवठा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातूनही आवक सुरू होण्याची शक्यता आहे. हा पुरवठा पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर खाली येण्याची शक्यता आहे.

कुठे स्वस्तात मिळणार टोमॅटो?

यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईतून तात्काळ टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून टोमॅटो खरेदी केले जातील आणि प्रमुख केंद्रांवर पाठवले जातील जेथे गेल्या एका महिन्यात टोमॅटोचे जास्तीत जास्त किरकोळ दर नोंदवले गेले आहेत. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटो सवलतीच्या दरात विकले जातील, अशी अपेक्षा आहे.

टोमॅटोच्या संकटाचा फटका अर्थव्यवस्थेला 

अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते, हवामान बदलामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये जगभरात 4.52 दशलक्ष टन टोमॅटोशी संबंधित उत्पादनांचे उत्पादन झाले. 2028 पर्यंत ते 56.5 लाख टन होईल असा अंदाज आहे. 2022-23 मध्ये टोमॅटोची बाजारपेठ 197.76 अब्ज डॉलर इतकी होती. 2028 मध्ये ते 249.53 अब्ज डॉलर पर्यंत वाढेल. अशा परिस्थितीत टोमॅटो पिकावर परिणाम झाला तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार आहे.