Petrol and Diesel Latest Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढीदरम्यान आज भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) दिलासा मिळाला आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची सप्टेंबर फ्युचर्स किंमत प्रति बॅरल 80.17 डॉलर आहे. WTI ऑगस्ट फ्युचर्सची किंमत प्रति बॅरल 75.79 डॉलर वर आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड किंवा ब्रेंटची किंमत कमी असो वा जास्त, पण त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होताना दिसत नाहीये. 13 जुलैसाठी भारतीय तेल विपनण कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. 13 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. इंडियन ऑइलच्या नवीन दरानुसार, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 रुपये आहे, तर डिझेल किंमत 98.24 रुपये आहे. तर पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. बिहार, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 प्रति लिटर आणि डिझेल 89.62 वर स्थिर आहे.
अमृतसरमध्ये पेट्रोल 98.74 रुपये आणि डिझेल 89.04 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये आहे.
इंदूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.66 रुपये आणि डिझेलची किंमत 93.94 रुपये आहे.
जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.48 रुपये आणि डिझेलची किंमत 93.72 रुपये आहे.
मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरही जीएसटी लागू होणार!
2017 मध्ये, सरकारने देशात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर लागू केला आहे. आता सर्व उत्पादनांवर देशभरात समान कर आकारला जातो. पेट्रोल-डिझेल हे एकमेव उत्पादन आहे जे अद्याप त्याच्या कक्षेत आलेले नाही आणि त्यानुसार राज्ये आणि केंद्र त्यावर कर आकारतात. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक जोहरी यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिले आहे. भारत पेट्रोल आणि डिझेलसारखी उत्पादनेही जीएसटीच्या कक्षेत आणू शकतो. या संदर्भात जगातील इतर देशांमध्ये चालणारे मॉडेल स्वीकारता येईल, असे विवेक जोहरी यांनी सांगितले.