Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी ओला कार बूक केली होती. पण ओला चालकाला मृतदेह ठेवण्यात आलेल्या पोत्यावर रक्ताचे डाग दिसल्याने शंका आली. नोएडामधील या चालकाने यानंतर पोलिसांना माहिती दिली आणि आरोपींचा चेहरा उघड झाला. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
प्राथमिक तपासात कुसूम कुमारी असं पीडित महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवरुन तिच्याच दोन नातेवाईकांनी तिची हत्या केली. या मालमत्तेची किंमत तब्बल 40 कोटी इतकी आहे.
आरोपी हा पीडित महिलेचा मेहुणा आहे. त्याने आणकी एका नातेवाईकाच्या मदतीने महिलेची हत्या केली. 11 जुलैला आरोपी मेहुणा आणि त्याच्या नातेवाईकाने नोएडा ते महाराजपूरपर्यंत ओला बूक केली होती. त्यांनी ओला कारमधूनच मृतदेह नेला होता. पण चालकाने जेव्हा डिक्कीत एक पोतं ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्यात हालचाल होत असल्याचं आणि रक्त वाहत असल्याचं जाणवलं.
जेव्हा कारचालकाने जाण्यास नकार दिला तेव्हा दोन्ही आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर चालकाने तेथून पळ काढला आणि हायवेवरील पोलिसांकडे धाव घेतली. त्याने महाराजपूर पोलिसांनाही याची माहिती दिली.
पोलिसांनी चौकशी सुरु केली असता, जवळच्या गावातील पीडित महिला कुसूम आणि तिचा मेहुणा सौरभ बेपत्ता असल्याचं समोर आलं. पोलिसांना तपासात आरोपीने कुसूमला महाराजपूर येथून आणण्यासाठी नोएडामध्ये कार बूक केल्याचं समजलं.
सौरभने कुसूमची हत्या करण्यासाठी आधीच आपल्या नातेवाईकाला महाराजपूर येथे बोलून घेतलं होतं. 11 जुलैला कुसूमची हत्या केल्यानंतर कारच्या डिक्कीत मृतदेह टाकत त्याची विल्हेवाट लावण्याची योजना होती. पण ओला चालक मनोजला बॅगेवर रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांचा कट फसला आणि त्यांचे चेहरे उघड झाले.
पोलिसांना रविवारी फतेहपूर येथे कुसूमचा मृतदेह सापडला आहे. सोमवारी तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. पोलिसांनी कुसूमच्या हत्येच्या आरोपाखाली तिघांना अटक केली आहे. हत्येत सहभागी इतर आरोपींचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.