UP Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडकडून खूप मोठा धक्का मिळाला आहे. हा धक्का इतका मोठा आहे की तरुणाला यातून सावरता आले नाही, असे काही घडेल याची त्याला अजिबात जाणीव नव्हती. या तरुणाचे अश्लील फोटो बनवून 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे पैसे न दिल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याला मिळाली आहे. केवळ धमकी देऊन ती थांबली नाही तर तिने त्याचे अश्लील फोटो व्हायरल देखील केले आहेत.
पैसे न दिल्यास तुझे सर्व अश्लील फोटो सोशल मीडियात सर्वांना दिसतील, अशी धमकी तरुणाला गर्लफ्रेंडने दिली. यानंतर हा तरुण खूपच घाबरला. अचानक एक दिवस घडू नये ते घडले. गर्लफ्रेंड या नादात तरुणाची हातची नोकरी गेली. एवढेच नाही तर तरुणाचे लग्नाचे नातेही तुटले. तरुणाने सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.
प्रयागराज येथील रहिवासी असलेला युवक सरोजिनी नगर औद्योगिक परिसरात असलेल्या ऑटोफॉर्ममध्ये काम करायचा. यादरम्यान लखनऊच्या आझाद नगरमध्ये त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. जिथे उन्नावमधील बिघापूर येथे राहणारी हेमा नावाची मुलगी आधीच राहत होती. एकाच घरात राहत असताना तरुण आणि तरुणीची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये फोनवर गप्पा सुरू झाल्या.
यावेळी आरोपी हेमाने तरुणाचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले. त्यानंतर ती हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. मात्र, यादरम्यान त्याने हेमाला समजवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ती मान्य झाली नाही आणि 10 लाख रुपयांची मागणी करू लागली.
पैसे न दिल्याने आरोपी हेमाने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार केले. तिने तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
तरुणीने आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. त्यामुळे आपली नोकरी गेल्याचेही त्याने सांगितले. ज्या मुलीशी संबंध पक्के झाले, तिच्यासोबतचे लग्न मोडल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याने सायबर सेलमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.
'या संपूर्ण प्रकरणावर तरुणाच्या बाजूने तक्रार घेण्यात आली आहे. नोंदणी केल्यानंतर प्रथमदर्शनी घटना सत्य असल्याचे आढळले. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याची' माहिती डीसीपी सेंट्रल झोन अपर्णा रजत कौशिक यांनी दिली.