Happy New Year 2025: 2024 वर्ष संपले असून 2025 या नविन वर्षाचे आगमन झाले आहे. जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने नविन वर्ष साजरे केले जाते. भारतातही थर्टी फस्टच्या रात्रीपासून नविन वर्षाचे सेलिब्रेशन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का फक्त 1 जानेवारीच नाही तर भारतात 5 वेळा नविन वर्ष साजरे केले जाते. जाणून घेऊया कधी आणि कशा प्रकारे 5 वेळा नविन वर्षाचे स्वागत केले जाते.
1 जानेवारी 2025 पासून सर्वांनीच नविन वर्षात पदार्पण केले आहे. एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पण भारतात नववर्ष फक्त 1 जानेवारीलाच नव्हे तर वर्षातून पाच वेळा साजरे केले जाते. याचे कारण म्हणजे भारतातील सर्व धर्मांची स्वतःची धार्मिक दिनदर्शिका असते आणि त्यानुसार त्या धर्मांचे अनुयायी त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात. यामुळे विविध धार्मिक दिनदर्शिका भारतात वर्षभरात 5 वेळा नववर्ष साजरे केले जाते.
सर्वप्रथम, हिंदू धर्माबद्दल जाणून घेऊयात. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. कारण हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र हा वर्षाचा पहिला महिना आहे. यामुळे शुक्ल प्रतिपदा ही पहिली तारीख मानली जाते. इंग्रजी कॅलेंडरमध्ये ही तारीख एप्रिल महिन्यात येते. भारतात, हिंदू नववर्ष वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जाते. या दिवशी लोक आपल्या देवी-देवतांची पूजा करतात आणि अनेक ठिकाणी धार्मिक विधीही आयोजित केल्या जातात.
ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदा ही हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. त्याचप्रमाणे इस्लाममध्ये नवीन वर्षाची सुरुवात मोहरम महिन्याच्या पहिल्या तारखेपासून होते. मोहरम महिना मुस्लिम दिनदर्शिकेची सुरुवात मानली जाते. हजरत मोहम्मद ज्या दिवशी मक्का सोडून मदिना येथे आले त्या दिवसापासून हिजरी कॅलेंडर सुरू झाल्याचे मानले जाते. मुस्लीम धर्मात मोहरम आणि रमजान या महिन्यांला खूप महत्त्व आहे. चैत्र-वैशाखप्रमाणेच इस्लामिक कॅलेंडरमध्येही मोहरम-सफर असे 12 महिने असतात.
शीख धर्मात नवीन वर्षाची सुरुवात बैसाखीपासून होते. शिखांच्या नानकशाही कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष दरवर्षी 13 किंवा 14 एप्रिल रोजी साजरे केले जाते. या दिवशी 10 वे शीख गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती आणि या दिवसापासून देशाच्या अनेक भागात पिकांची कापणी सुरू होते. वैशाख महिनाही याच तारखेपासून सुरू होतो. जैन धर्मात नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीच्या आसपास होते आणि त्याला वीर निर्वाण संवताची सुरुवात म्हणतात.
पारशी धर्मात नवीन वर्ष नवरोज म्हणून ओळखले जाते. ही परंपरा सुमारे तीन हजार वर्षे जुनी असून या दिवसाची सुरुवात पर्शियन राजा जमशेद याने केली होती. याला जमशेद-ए-नौरोज असेही म्हटले जाते. त्यांनी पारशी दिनदर्शिका सुरू केली. नवरोज वर्षातून दोनदा 21 मार्च आणि 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. काही लोक पारशी दिनदर्शिकेनुसार साजरे करतात तर काही लोक शाहनशाही कॅलेंडरनुसार नवीन वर्ष म्हणजेच नवरोज साजरे करतात.
ख्रिश्चन धर्मात नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरे केले जाते. भारतातही नवे वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होऊन 31 डिसेंबरला संपते. केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतांश देशांमध्ये 1 जानेवारीला नववर्ष साजरे केले जाते.
जगभरात 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात का मानली जाते. ही परंपरा किती काळापासून चालत आलेली आहे यामागची कहानी रंजक आहे. नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुमारे 450 वर्षे जुनी आहे. 1 जानेवारी 1582 पासून याची सुरुवात झाली. नवीन वर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी साजरे केले जाते.
हे जगातील सर्वात लोकप्रिय कॅलेंडर मानले जाते आणि भारतासह बहुतेक देशांनी त्यानुसार सरकारी कामाच्या तारखा निश्चित केल्या आहेत. पूर्वी ज्युलियन कॅलेंडर वापरात होते. मात्र, यात काही बदल केल्यानंतर, ग्रेगोरियन कॅलेंडर 1582 मध्ये रोमच्या पोपने सुरू केले. या कॅलेंडरमध्ये 30 दिवसांचे चार महिने, 31 दिवसांचे सात महिने आणि फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत. परंतु दर चौथ्या वर्षी, फेब्रुवारीमध्ये एक दिवस जोडला जातो, परिणामी फेब्रुवारी 29 दिवसांचा होतो, ज्याला लीप वर्ष देखील म्हणतात.