'जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून...'; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया

Opposition MPs Suspension : विरोधी पक्षातील 141 खासदारांच्या निलंबनानंतर मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते लोक जास्त प्रश्न विचारत होते म्हणून त्यांना निलंबित केले असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 20, 2023, 01:26 PM IST
'जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून...'; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया title=

Opposition MPs Suspension : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील वातावरण तापलं आहे. तसेच लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित खासदारांवर लोकसभा सचिवालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. निलंबित 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, गॅलरी आणि लॉबीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे तृणमूलच्या खासदाराने उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्यामुळे सत्ताधारी भाजपने देखील विरोधकांना धारेवर धरलं आहे. अशातच मथुरेच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो.

खासदारांच्या निलंबनावर भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते खूप प्रश्न विचारतात आणि विचित्र वागतात,' असे हेमा मालिलींनी स्पष्ट शब्दांत सांगितले. विरोधी खासदारांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आणि विचित्र वागले, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. हेमा मालिनी म्हणाल्या, 'बघा, ते अनेक प्रश्न उपस्थित करतात, ते विचित्र वागतात. यासाठी त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबित केले कारण ते चुकीचे करत आहेत. विरोधकांचे एकमेव लक्ष्य संसदेत व्यत्यय आणणे आणि मोदी सरकारला विरोध करणे आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत आहे, पण त्याला यश मिळणार नाही. विरोधी खासदारांच्या निलंबनाचे औचित्य साधून भाजप खासदार म्हणाले की, निलंबनाचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांनी काहीतरी चुकीचे केले आहे.

हेमा मालिनी यांचा हा व्हिडिओ शेअर करताना तेलंगणा काँग्रेसचे नेते समा राम मोहन रेड्डी यांनी टीका केली आहे. "अखेर भाजपच्या एका खासदाराने काँग्रेस आणि विरोधी खासदारांच्या निलंबनाचे कारण उघड केले आहे," असे काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे. संसदेत गदारोळ झाल्यानंतर खासदारांना कडक कारवाईला सामोरे जावे लागले. विरोधी खासदार लोकसभेच्या सुरक्षेबाबत सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाची मागणी करत होते. दुसरीकडे, लोकसभेच्या अध्यक्षांनी म्हटले होते की सभागृहातील सुरक्षेशी संबंधित कोणतीही घटना सचिवालयाच्या अखत्यारीत येते आणि ते केंद्राला हस्तक्षेप करू देणार नाहीत.

नेमकं काय घडलं?

13 डिसेंबर रोजी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी खासदारांच्या मधोमध उड्या मारल्या. यावेळी त्यांनी पायात लपवून ठेवलेली धुराची नळकांडी बाहेर काढली आणि धुर पसरवला. संसदेबाहेरही आणखी दोन जणांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेतील कुचराईचे हे मोठे प्रकरण होते. या चार आरोपींवर यूएपीएसह इतर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी बोलण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी लोकसभेत गदारोळ केला. यावेळी खासदार फलक घेऊन पोहोचले होते. इशारा देऊनही खासदार थांबले नाहीत तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या खासदारांना उर्वरित अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.