up election 2022 : त्यांना फक्त "इटलीमधील नानी" बंधू-भगिनींची काळजी

योगी आदित्यनाथ यांनी केली या नेत्यांवर टीका  

Updated: Jan 31, 2022, 02:06 PM IST
up election 2022 : त्यांना फक्त "इटलीमधील नानी" बंधू-भगिनींची काळजी title=

लखनौ : उत्तर प्रदेशच्या निवडणुक प्रचारात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला दिसत आहेत. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

देशाला जेव्हा कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचा सामना करावा लागला तेव्हा त्यांना फक्त "इटलीमधील नानी" बंधू-भगिनींची काळजी होती अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्षावरही हल्लाबोल केला आहे. तर, समाजवादी पक्षाला त्यांनी ‘काका-पुतण्यांचा पक्ष’ असे म्हटले आहे. त्यांचा रोख सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव यांच्याकडे होता.

राज्यातील यापूर्वीच्या सरकारांना विकासासाठी वेळ मिळाला नाही. "सपाने विकास केला तो केवळ काका-पुतण्याचा, राज्याचा नाही." त्यामुळे पुन्हा समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशात ‘माफिया राज’ येईल. आता तुरुंगात असलेल्या माफियांची सुटका होईल, असे आदित्यनाथ म्हणाले. 

कोविड-19 विरोधी लसीचे राज्यात एकूण 26 कोटी डोस दिले आहेत. यामुळे सर्वात जास्त डोस देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, देशात कोरोनाचे संकट आले तेव्हा भाऊ-बहिणीच्या पक्षाला देशाची पर्वा नव्हती. त्यांना फक्त इटलीतील आपल्या 'नानी'चा विचार केला, अशी टीका त्यांनी केली.