संसद भवनातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढली

आधी ४०२ कर्मचारी बाधित आणि आता...

Updated: Jan 12, 2022, 02:59 PM IST
संसद भवनातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढली  title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरूच असून याचा फटका संसद भवनालाही बसला आहे. येथील ४०२ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यानंतर आता आणखी ११९ कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाने गाठले आहे. या कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असून कोरोनाने राजकीय नेत्यांनाही आपला विळखा घातला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली. तर संसद भवनातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी यांनाही कोरोनाने गाठले आहे.

संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची सहा आणि सात जानेवारी रोजी कोविड चाचणी करण्यात आली. यावेळी तब्बल ४०२ कर्मचारी कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर कोविड चाचण्याची मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात आली.    

या मोहिमेदरम्यान आणखी ११९ कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत अशी माहिती संसद भवनातून देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले आहे. असे असताना लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांसाठी काम करणारे ५०० हुन अधिक कर्मचारी पॉझेटिव्ह आल्याने ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा वेगवान पावले उचलत आहे.  

दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट वाढला
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर दिल्लीत कोविड पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांवर गेला असून गेल्या २४ तासांत दिल्लीत २१ हजार २५९ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. दिल्ली सरकारने निर्बंध अधिक कडक केले असून खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.