नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयानं सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे. केंद्रीय गृह खात्यानं गेल्या ८ फेब्रुवारी रोजी काश्मिरातील सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या या पत्राची प्रत झी २४ तासच्या हाती आली आहे. दहशतवाद्यांमार्फत आयईडीचा वापर करून हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुकड्या रवाना करण्यापूर्वी संपूर्ण परिसर सुरक्षित आहे याची नीट खातरजमा करुन घ्या, अशी सावधगिरीची सूचना या पत्रात देण्यात आली होती. त्यामुळं केंद्र सरकारनं सावध केलेलं असतानाही योग्य खबरदारी का घेतली गेली नाही, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
पुलवामाच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटू लागले आहेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत लष्कराला प्रत्युत्तरादाखल करण्याच्या कारवाईचे सर्वाधिकार देण्यात आले. तर दुसरीकडं दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुलवामातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. बडगाममध्ये सर्व हुतात्म्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. राजनाथ सिंह यांच्यासह सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, लष्कराचे उत्तर कमांडचे प्रमुख तसंच विविध लष्करी आणि मुलकी अधिकारी उपस्थित होते. शहिदांना मानवंदना दिल्यानंतर शहिदांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी गृहमंत्र्यांनी स्वतः पार्थिवांना खांदा दिला. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य आलं.