Burari Deaths Case, उदयपूर : राजधानी दिल्लीत घडलेल्या बुराडी सामुहिक आत्महत्या (Burari Deaths Case) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेची आठवण करुन देणारी अशीच एक थरारक घटना आता राजस्थानमधील(Rajasthan ) उद्यपूरमध्ये(Udaipur) घडली आहे. एकाच घरात चार फास आणि सहा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील बुराडी येथे एकाच कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता उदयपूरमधील गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची घटना घडली आहे. प्रकाश गमेटी असे मृत कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. त्याच्या पत्नीचे नाव दुर्गा गमेती असे आहे. या दोघा पत्नीसह चार मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. यात 4 महिन्यांचा गंगाराम, 5 वर्षांचा पुष्कर, 8 वर्षांचा गणेश आणि 3 वर्षांचा रोशन यांचा समावेश आहे.
प्रकाश शेती करुन आपल्या कुटुंबाचा उरनिर्वाह करत होता. दररोज तो शेतात जाऊन काम करत असे. मात्र, तो शेतावर न आल्याने त्याचा भावाने चौकशी करण्यासाठी त्याचे घर गाठले. बराच वेळ दरवाजा वाजूनही काहीच प्रतिसाद न आल्याने प्रकाशच्या भावाने ग्रामस्थांना बोलावून घराचा दरवाजा तोडला. समोर जे दृष्य दिसले ते पाहून प्रकाशच्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. समोर प्रकाश त्याची पत्नी आणि त्यांच्या चार मुलांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले. प्रकाशच्या पत्नीच्या मृतदेहावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. प्रकाश याने आधी चार मुलांची गळा दाबून हत्या केली. यानंतर पत्नीला फास लावला आणि स्वत: आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्थिक विवंचनेतून प्रकाशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.