नवी दिल्ली : भाजपने निवडणुकीसाठी एनडीएची मोठ बांधली होती. ही मोठ आता हळहळू सुटायला लागली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेलुगू देसम पार्टीने घेतला. अखेर चंद्राबाबू नायडूंनी हा निर्णय घेतलाय. त्याची केवळ घोषणा राहिलेय.
उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपला मोठा धक्का बसलाय. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्षाने अखेर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याची औपचारिक घोषणा केवळ बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितलं. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी टीडीपीने आज हा निर्णय घेतला.
तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी तेलुगू देसमने केली. ती मान्य होत नसल्याने गेल्याच आठवड्यात तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.
दुसरीकडे, नायडू हे नव्या आघाडीसाठी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्याशी चर्चा करू शकतात, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे. तर वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यात.
दरम्यान, या नोटिसीला किमान ५० खासदारांचा पाठिंबा मिळाला तरच ठराव आणला जाईल. अर्थात भाजपचे बहुमत लक्षात घेता ठराव आला तरी तो मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे.