नवी दिल्ली : एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचे, चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने सध्या तरी स्पष्ट केले आहे. पक्षातील नेते वाय.एस.चौधरी यांनी टीडीपीच्या बैठकीनंतर याविषही सांगितलं. यावर सविस्तर बोलताना चौधरी म्हणाले, भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर पुढच्या चार दिवसात तोडगा काढला जाईल.
सरकारने आंध्र प्रदेशच्या अपेक्षेनुसार, राज्यासाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचं टीडीपी नेत्यांचं म्हणणं होतं. पक्षाचे अध्यक्ष आणि चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम पक्षाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उघड नाराजी व्यक्त केली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनीही अर्थसंकल्पावरील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.
तसेच भाजपचे महासचिव राम माधव यांनी, टीडीपी हा आमचा जुना सहकारी पक्ष आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन, तोडगा काढू असं म्हटलं होतं.
तर आज सकाळी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केल्याचं म्हटलं जात होतं, पण अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं तेलगू देसम पार्टीच्या नेत्यांनी बैठकीनंतर सांगितलंय.