मोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली.

Updated: Sep 18, 2017, 07:15 PM IST
मोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत title=

चेन्नई : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली. त्याचीच पुनरावृत्ती आता तामिळनाडूच्या राजकारणामध्ये पाहायला मिळू शकते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि AIADMKचे नेते ई पलानीस्वामी यांनी भविष्यात भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारसोबत युती केली तर ते राज्यासाठी फायद्याचं असेल असं पलानीस्वामी म्हणालेत.

रविवारी एमजीआर जन्मशताब्दी समारोहाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पलानीस्वामींनी हे वक्तव्य केलं आहे. केंद्रातल्या भाजप सरकारसोबत गेलं तर राज्याला मोठी प्रोजेक्ट आणि कल्याणकारी योजनाही मिळतील, असं पलानीस्वामी कार्यकर्त्यांना म्हणाले.

आत्तापर्यंत डीएमके १४ वर्ष केंद्रात सत्तेत राहिली पण त्यांनी स्वत:च्या कुटुंबालाच मंत्रीपद दिल्याची टीकाही पलानीस्वामींनी केली आहे. एकीकडे पलानीस्वामी भाजपसोबत जायचे संकेत देत असतानाच तामिळनाडूत AIADMK मधले वाद सुरूच आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी AIADMKच्या शशीकला यांचे भाचे टीटीवी दिनाकरन गटाच्या १८ आमदारांना निलंबित केलं आहे.

हे निलंबन पलानीस्वामी आणि पनीरसेलवम यांच्यामधला वाद मिटल्यानंतर झालं आहे. याचबरोबर AIADMKच्या महासचिव पदावरून शशीकला यांची आणि उपमहासचिव पदावरून दिनाकरन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.