सुषमा स्वराजांनी चीनसमोर लोटांगण घातलेय- राहुल गांधी

सुषमा स्वराज यांच्यासारख्या व्यक्तीने चिनी शक्तींपुढे अशाप्रकारे लोटांगण घालणे खूपच धक्कादायक गोष्ट आहे. 

Updated: Aug 2, 2018, 01:09 PM IST
सुषमा स्वराजांनी चीनसमोर लोटांगण घातलेय- राहुल गांधी title=

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिनी सामर्थ्यापुढे अक्षरश: लोटांगण घातले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आऊटलूक मासिकाने डोकलामसंदर्भात प्रकाशित केलेल्या एका लेखाचा संदर्भ देत राहुल यांनी भाजप आणि सुषमा स्वराज यांना धारेवर धरले आहे. 

सुषमा स्वराज यांच्यासारख्या व्यक्तीने चिनी शक्तींपुढे अशाप्रकारे लोटांगण घालणे खूपच धक्कादायक गोष्ट आहे. नेत्यांची ही लाचारी सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, अशी जळजळीत भाषा राहुल यांनी ट्विटमध्ये वापरली आहे. 

डोकलाम वादावरुन सुषमा स्वराज यांनी बुधवारी लोकसभेत माहिती दिली होती. डोकलामचा वाद राजकीय परिपक्वतेने मिटवण्यात आला असून देशाने एक इंचदेखील जमीन गमावलेली नाही, 'जैसे थे' परिस्थिती कायम राखली गेली आहे, असे त्यांनी सांगितले होते.

सुषमा स्वराज यांनी हे संसदेत स्पष्टीकरण दिले असतानाच दुसरीकडे अमेरिकेने डोकलामसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले होते. भारत आणि चीनने आपापले सैन्य मागे घेतले असले तरी चीन छुप्या पद्धतीने डोकलाममध्ये सक्रीय होत आहे, असे अमेरिकेने सांगितले होते.