Mumbai Mhada Lottery Update: मुंबईसारख्या शहरात घर घेणे हल्ली सगळ्यांनाच परवडेल असं नाही. घराच्या किंमतीच्या वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना घर परवडत नाहीत. त्यामुळं अनेक मुंबईकर म्हाडाच्या घरांसाठी अवलंबून असतात. म्हाडाने 2024 मध्ये घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा म्हाडा लॉटरी काढण्याची शक्यता आहे. म्हाडा सुमारे तीन-चार हजार घरांची लॉटरी काढणार असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील वर्ष-दीड वर्षात कोणते प्रकल्प पूर्ण होऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असतानाच लॉटरी काढून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घरांचे पैसे भरता येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२४ मध्ये २०२० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल एक लाख १३ हजार अर्ज आले होते, म्हणजे एका घरासाठी ५५ अर्ज एवढी स्पर्धा होती, त्याची दखल घेत म्हाडाने नव्या वर्षात पुन्हा लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबईत सध्या म्हाडाकडे तयार घरांची किंवा ओसीपर्यंत आलेल्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांमधील घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांनी २५ टक्के रक्कम भरल्यानंतरच गृहकर्जासाठी म्हाडाकडून एनओसी मिळते. आता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार आहेत. घरांची लॉटरी काढताना ही घरे कधीपर्यंत पूर्ण होतील, घराचा ताबा कधी मिळेल, याबाबतची माहिती समोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना घरासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे.
हाडाने घरांची लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना घराचा ताबा देण्याबाबत पत्र पाठवले जाते. त्यानुसार सुरुवातीला घराच्या एकूण किमतीपैकी २५ टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडा गृहकर्जासाठी एनओसी देते. त्यामुळे एकाचवेळी विजेत्यांना मोठ्या रकमेची जमवाजमव करणे कठीण होते, मात्र म्हाडा बांधकामाधीन घरांची लॉटरी काढल्यानंतर ती पूर्ण होण्यास दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे घर खरेदीदाराला इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यानुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.