नारायण मूर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्याची सुधा मूर्तींनी केली पाठराखण, स्पष्टच म्हणाल्या...

Narayana Murthy News: नारायण मूर्ती यांनी केलेले वक्तव्य अलीकडेच चर्चेत आले आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला होता

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 31, 2023, 04:02 PM IST
नारायण मूर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्याची सुधा मूर्तींनी केली पाठराखण, स्पष्टच म्हणाल्या... title=
Sudha Murty reacts on Narayana Murthys 70 hour work week advice

Narayana Murthy 70 Hour Work Week Advice:  इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेल्या एका विधानावरुन देशात चर्चांना उधाण आलं आहे. पुढील पिढीसाठी आठवड्यात 70 तास काम करण्याची संस्कृती देशात रुजू व्हावी, असं वक्तव्य त्यांनी केले होते. नारायण मूर्ती यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर व अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, काही मंडळींनी त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला आहे. यात मूर्ती यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर मत व्यक्त केलं आहे. 

काय म्हणाले होते नारायण मूर्ती?

नारायण मूर्ती यांनी पॉडकास्टदरम्यान भारतातील वर्क कल्चरवर भाष्य केलं होतं. जपान आणि जर्मनीचे उदाहरण देत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. देशातील तरुण जर आठवड्यात 70 तास काम केले तर जगातील त्या अर्थव्यवस्थेची आपण स्पर्धा करु शकतो ज्यांनी दोन ते तीन वर्षांत यश मिळवलं आहे. पण नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद रंगला आहे. मूर्ती यांनी सांगितलेली कामाच्या पद्धतीमुळं तरुणांच्या जीवनशैलीवर घातक परिणाम होऊ शकतो, असा तर्क लढवण्यात येत आहे. 

नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर सूधा मूर्ती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  मुंबईत होणाऱ्या 14व्या टाटा लिट फेस्टसाठी सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी मूर्तींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नारायण मूर्ती यांचा मेहनती व कष्टावर विश्वास आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आठवड्यातून 80 ते 90 तास काम केले आहेत. त्यामुळं नॉर्मल वर्किंग वीक कसा असतो हे ते पूर्णपणे समजलेले नाहीये. त्यांचा मेहनतीवर विश्वास आहे आणि त्यांनी त्यानुसारच त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यतित केलं आहे. त्यांनी फक्त त्यांचा अनुभव मांडला आहे, असं सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केलं आहे. 

सोशल मीडियावर वाद 

नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एडलवाइस म्युचुअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी देखील यावर ट्विटकरत  टोला लगावला आहे. भारतातील अनेक महिला आठवड्यातून 70 तासांपेक्षा जास्त तास काम करतात. भारत आणि आपली पुढच्या पीढीसाठी भारतीय महिला घर आणि ऑफिसमध्येही 70 तासांपेक्षा जास्त काम करतात. महिला गेल्या कित्येत दशकांपासून चेहऱ्यावर हसू ठेवून भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत.