पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचं संरक्षण मंत्री हे पद भूषवणारे मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड.... असं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि सारा देश हळहळला. मातृभूमीच्या संरक्षणापासून गोव्याच्या राजकारणात स्थैर्य आणण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या पर्रिकर यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निय़धन झालं. ते आज आपल्यात नसले तरीही त्यांचं काम आणि याच कामाचे घातलेला पायंडा यांच्या माध्यमातून ते कायमच स्मरणात राहतील. मनोहर पर्रिकर यांचं आयुष्य तस नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलं. मुळात देशाचे संरक्षण मंत्रीपद सांभाळणाऱ्या पर्रिकरांची जीवनशैली हा आणखी एक आकर्षणाचा विषय.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचाच प्रत्यत त्यांच्या कृतीतून यायचा आणि येत राहील. मनोहर पर्रिकर यांच्या खासगी आयुष्यात डोकावलं तर त्यांची सुरेख प्रेमकहाणी अनेकांचच लक्ष वेधते. आयुष्यभराची साथ देणाऱी त्यांची पत्नी अर्ध्यावरच पर्रिकरांची साथ सोडून गेली. आजरपणामुळेच त्यांनी या जगाचा निरकोप घेतला आणि आपली जवळची माणसंच साथ सोडत असल्याची भावना पर्रिकरांच्या मनात घर करुन गेली होती.
मेधा आणि मनोहर पर्रिकरांचा प्रेमविवाह. ज्यावेळी ते आयआयटी मुंबईत शिकत होते, तेव्हा घरच्या जेवणाची आठवण आली की पर्रिकर थेट मुंबईत बहिणीच्या घरी पोहोचायचे. मेधा या पर्रिकरांच्या बहिणीची नणंद. त्यामुळे तिथेच दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. दोघांचंही पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं. पुस्तकांबद्दल बोलता बोलता दोघे ऐकमेकांच्या कधी प्रेमात पडले हे कळलंही नाही. अभ्यास एके अभ्यास करणारे पर्रिकर प्रेमात पडतील, असं मित्रांना मुळीच वाटलं नव्हतं. मुंबईत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. पण संसार मात्र गोव्याच्या म्हापशात थाटला.
यथावकाश उत्पल आणि अभिजात, अशी दोन मुलं झाली. या काळात मनोहर पर्रिकर गोव्यातली फँक्टरी, संघचालकपद आणि भाजपासाठी काम, या जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यानंतर १९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोव्यात आमदार झाले. खरं तर मेधा आणि मनोहर पर्रिकर या दोघांनी व्यवसायात यशस्वी होण्याची स्वप्नं पाहिली होती. म्हणूनच पुढची १० वर्षंच राजकारण करीन, नंतर फक्त फँक्टरीचं काम पाहीन, असं वचनही मनोहर पर्रिकरांनी मेधा यांना दिलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मेधा पर्रिकरांना रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं.
आजाराचं निदान झाल्यापासून महिनाभरातच त्यांचं निधन झालं. मनोहर पर्रिकर राजकारणातील एकेक टप्पा पार करत असतानाच त्यांचा भक्कम आधार कोसळला. मग जिच्यासाठी राजकारण सोडायचं होतं, तिच राहिली नाही म्हणून पर्रिकर राजकारणात सक्रिय झाले. पण पत्नीला दिलेलं वचन निभावत त्यांनी व्यवसायाकडेही लक्ष दिलं. दोन मुलांना वाढवलं. पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आई, वडील आणि पत्नी या तिघांचीही साथ सुटली होती. त्यानंतरही पर्रिकरांनी राजकारणात सक्रिय राहून घरची, मुलांची, व्यवसायाची जबाबदारी सक्षमपणे पेलली. अखेरच्या श्वासापर्यंत हा नेता खऱ्या अर्थाने लढवय्या राहिला.