लग्नासाठी उतावळा फौजी; लष्करी अधिकाऱ्यांची डोकेदुखी

उतावळा नवरा गुडघ्याला बाशींग

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 23, 2018, 05:39 PM IST
लग्नासाठी उतावळा फौजी; लष्करी अधिकाऱ्यांची डोकेदुखी title=

बंगळुरू : भारतीय लष्करातील एक जवान लष्करी अधिकाऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरला आहे. हा जवान आपला लष्करी कॅम्प सोडून वारंवार धुम ठोकत आहे. धुम ठोकण्याचे कारणही मोठे मजेशीर. हा जवान लग्न करू इच्छितो. तो इतका लग्नाळलेला आहे की, लग्नाच्या विचाराने आतापर्यंत तो चक्क दोन वेळा लष्करी कॅंम्प सोडून पळाला होता.

आतापर्यंत दोन वेळा पळाला

पळालेल्या या जवानाला लष्करी अधिकाऱ्यांनी तब्बल चार महिन्यांनी मोठ्या परिश्रमाने पकडले. हा जवान बंगळुरूच्या स्टेशनवरून पळाला. हा जवान मुळचा आंध्र प्रदेशातील कृष्णानगर येथील असून, पी. नवीन असे त्याचे नाव आहे. आता पर्यंत आर्मी कॅम्पमधून तो दोन वेळा पळाला आहे. ४ महिन्यांनंतर लष्कराने त्याला पकडले पण, बंगळुरू रेल्वे स्टेशनवरून तो पुन्हा पळाला. त्यामुळे लष्कर पुन्हा एकदा त्याचा शोध घेत आहे.

साहसाबद्धल लष्कराकडून कौतूक

जवान पी. नवीन हा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील आहे. देशसेवेचा विचार मनात असल्यामुळे तो लष्करात भरती झाला आहे. सुमारे ८ वर्षे ५ महिने इतका प्रदीर्घ कालावधी त्याने लष्कारात घालवली. त्याचे धाडस, कामगिरी आणि एकूण वर्तन याचे लष्कराकडून वेळोवेळी कौतूक झाले आहे. मात्र, गेल्या वर्षी (२०१७) मध्ये हरियाणातील अबाला मिलिटरी कॅम्पच्या मद्रास रेजिमेंटमधून तो पळाला. दरम्यान, तो आपल्या घरी परतू इच्छित असून, तो आता पुन्हा लष्करी सेवेत दाखल होऊ इच्छित नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. 

पोलिसांच्या मदतीने लष्करी अधिकारी घेतायत शोध

लष्करी अधिकाऱ्यांनी नवीनच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्याला पुन्हा लष्करात दाखल होण्यासाठी कळविण्यात आले आहे. तसेच, हरियाणा कॅम्प बटालियनचे प्रमुख एस बर्नबन सुंदर दास हे पळालेल्या जवानाच्या शोधार्थ आंध्र प्रदेशात पोहोचले. तसेच, लष्करी अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी त्याच्या वडीलांना फोन केला असता त्याचा शोध लागला.

सापडला, पकडला, पुन्हा पळाला

दरम्यान, तपास केल्यावर जवानाचा शोध लागला. त्याला अधिकाऱ्यांनी पकडलेही. मात्र, लष्करी सेवेसाठी घेऊन जात असताना बंगळुरूच्या क्रांतिवीर संगोल्लि रायणा रेल्वे स्थानकावरून त्याने पुन्हा एकदा पळ काढला. त्याला आर्मी कोर्टासमोर हजर करण्यात येणार होते. त्यामुळे अधिकाऱ्याने तो पुन्हा एकदा पळाल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या जवानावर कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.