'तुमच्या नेतृत्वाखाली आपण...'; 'जवान'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक

Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: सध्या आपल्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन एक पोस्ट केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 11, 2023, 02:29 PM IST
'तुमच्या नेतृत्वाखाली आपण...'; 'जवान'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक title=
मोदींचं कौतुक शाहरुखने केलं आहे

Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. रविवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जी-20' परिषदेचा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचं आग्रह केला. भारतामधील ही परिषद अतिशय फलदायी ठरल्याचं सांगत अमेरिका, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी भारताचं कौतुक केलं. याच परिषदेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट अभिनेता शाहरुख खानने रिट्वीट केलं आहे.

जवानमुळे शाहरुख चर्चेत

मागील काही दिवसांपासून 'जवान' चित्रपटामध्ये सातत्याने चर्चेत असलेला शाहरुख खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. मागील काही आठवड्यांपासून तो सातत्याने आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन चित्रपटासंदर्भात पोस्ट करत आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया, चित्रपटाचे रिव्ह्यू किंवा अगदी आस्क शाहरुख या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांशीही तो गप्पा मारतोय. मात्र रविवारी सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी शाहरुखने पंतप्रधान मोदींना टॅग करुन त्याचं ट्वीट रिट्वीट केलं.

शाहरुख नेमकं काय म्हणाला?

जी-20 च्या यशस्वी आयोजनासाठी शाहरुखने मोदींचं अभिनंदन केलं आहे. "माननीय पंतप्रधान नरेंद्र यांचे अभिनंदन! भारताने यशस्वीपणे जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भुषवल्याबद्दल तुमचं अभिनंदन. जगभरातील लोकांच्या उत्तम भविष्यासाठी सर्व राष्ट्रांमध्ये एकता असावी असा विचार मांडल्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो. ही परिषद पाहून प्रत्येक भारतीयला अभिमान वाटतोय आणि प्रत्येक भारतीयाचा मनात आनंद आहे," असं या ट्वीटमध्ये शाहरुख म्हणाला. पुढे बोलताना शाहरुखने, "सर, तुमच्या नेतृत्वाखाली आपण एकट्याने नाही तर एकत्रितपणे विकास करु. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य..." असाही विश्वास व्यक्त केला.

मोदी समारोपाच्या वेळी काय म्हणाले?

'जी-20' च्या समारोपामध्ये पंतप्रधान मोदींनी स्वस्ति अस्तु विश्व असा संदेश दिला. म्हणजेच जगभरामध्ये शांतता नांदो असं म्हणत मोदींनी या परिषदेची सांगता केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान मोदींनी, स्थापना झाली तेव्हा हा गट 51 देशांचा होता. आता संयुक्त राष्ट्रामध्ये एकूण 200 हून अधिक देश आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेतील स्थायी सदस्यांची संख्या अजूनही 5 इतकीच आहे. संपूर्ण जग बदलत असताना संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्येही बदल झाले पाहिजेत. हे बदल अमूलाग्र स्वरुपाचे हवेत. जगाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहेत. त्याचबरोबरच आजचे वास्तवही लक्षात घेणं आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले.