पाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है'

Lok Sabha Election 2024 : आरएलडीने सीमा हैदरला (Seema haider) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Feb 7, 2024, 06:32 PM IST
पाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है' title=
Seema haider, RLD, lok sabha election 2024

Seema haider In Lok Sabha elections campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections 2024) आता सर्व पक्ष तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात एनडीएची गाडी 400 च्या पार जाईल, अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर आता काँग्रेससह इतर विरोधी पक्ष देखील कामाला लागले आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema haider) महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीमा हैदर आता लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहे.

या पक्षाचा करणार प्रचार

पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांच्या लव्हस्टोरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. पाकिस्तानी सीमा भारतात स्टार झाली. संपूर्ण भारताच नव्हे तर पाकिस्तानात देखील सीमा हैदरची जोरदार चर्चा झाली होती. अशातच आता मथुरेच्या राजकारणात आरएलडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आरएलडीने सीमा हैदरला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.

आरएलडीच्या शिष्टमंडळाने रघुपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी सीमा हैदरची भेट घेतली अन् निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा केली. त्यावर आरएलडीचे प्रदेश उपाध्यक्ष कुंवर नरेंद्र सिंह यांनी माहिती दिलीये. पक्षाचे वरिष्ठ अधिकारी किशोर सिंग, गोविंद, स्वतंत्र पाल सिंग आणि इतर नेत्यांनी रघुपुरा येथे एका लग्न समारंभासाठी गेले असताना त्यांनी सीमा हैदरची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सीमाला ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कराचीहून आलेल्या सीमाला भेटल्यानंतर ती पाकिस्तानातून आली आहे असे वाटले नाही. त्यांना मथुरेचा पेडा आणि राधाकृष्णाची मूर्ती भेट दिली. त्यावेळी सीमाने वृंदावनचं प्रेममंदिर पाहण्याची इच्छा व्यक्त केली, असं आरएलडीच्या उपाध्यक्षांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. फक्त त्या गोष्टींची नावं वेगळी आहेत. भारतातील अनेक गोष्टी सचिन मला समजावून सांगतो. पण त्या समजून घ्यायला मला थोडा वेळ लागतो. पण मी समजून घेते, असं सीमा हैदरने म्हटलं होतं.