Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला (Seema Haider) एटीएसने (ATS) नोएडामधील (Noida) सेफ हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे. सीमासह तिचा मुलगा आणि प्रियकर सचिनही (Sachin) आहे. सीमा गुप्तहेर आहे का? यादृष्टीने एटीएस तपास करत आहे. मात्र 15 दिवसांनीही अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने शंका निर्माण होत आहे. रात्री उशिरा तिची सुटका करण्यात आली होती.
ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी नेलं होतं. यानंतर त्यांची रवानगी सेफ हाऊसमध्ये करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना सीमाला पाकिस्तानात पाठवा, अन्यथा 26/11 सारखा हल्ला करु अशी धमकी मिळाल्यानंतर घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंगळवारी दोघांची 11 हून अधिक तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, एटीएसचे अधिकारी सीमाची पॉलिग्राफी चाचणी करण्याचाही विचार करत आहेत.
एटीएसने सीमा हैदरची सर्व सोशल मीडिया अकाऊंटही तपासले आहेत. यामध्ये दिल्ली-एनसीआरमधील अनेकजण आढळले आहेत. सीमाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय लष्करातील काही जवानांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सीमाने आपले अनेक जबाब बदलले आहेत. चौकशी सुरु असताना ती सतत रडत होती.
सीमा आणि सचिनने एटीएसच्या चौकशीत सांगितलं की, सोशल मीडियावर त्यांच्या नाव बनावट अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. पाकिस्तानी लष्करात भाऊ असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता सीमाने काही उत्तर दिलं नाही, दरम्यान, सीमा अनेक प्रश्नांवर एटीसची दिशाभूल करत असल्याचा संशय आहे.
सीमाने आपल्या चार मुलांसह भारतात प्रवेश कसा केला? यासंबंधी गुप्तचर विभागाने (Intelligence Bureau) सीमा सुरक्षा दलाकडून रिपोर्ट मागवला आहे. सीमा बिहारच्या सीतामढी बॉर्डरला क्रॉस करुन नेपाळमार्गे भारतात आली होती. याच सीमारेषेवर एसएसबी तैनात आहे.
आयबीचं एक पथक संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेपाळच्या काठमांडूला जाणार आहे. हे पथक सीमा आणि सचिनने दिलेली प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणार आहेत. गुप्तचर विभागाला सीमाने 4 मुलांसह नेपाळ सीमारेषा ओलांडली तेव्हा तिला मदत केली गेली असा संशय आहे. यामागे नेमकं कोणीतरी आहे अशी त्यांना शंका आहे. ही व्यक्ती प्रभावशाली असावी असं वाटत आहे.