क्रूरतेचा कळस! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, झी 24 तासवर मांडल्या विद्यार्थ्यांनी व्यथा..

Updated: Feb 27, 2022, 07:59 PM IST
क्रूरतेचा कळस! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण title=

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष वाढला आहे. तणावाचं वातावरण असताना एक मोठी बातमी येत आहे. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना ही मारहाण करण्यात आली. 

भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेण्यासाठी जातात. तिथलं शिक्षण आर्थिकदृष्ट्या स्वस्त आणि चांगलं असल्याने बरेच विद्यार्थी युक्रेनमध्ये जातात. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम आता भारताला सोसावे लागत आहेत. तिथलं भीषण वास्तव आणि परिस्थिती विद्यार्थ्यांनी झी 24 तासला सांगितली. भूसीमामार्गे युक्रेन ओलांडणा-या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. 

क्रेनमधून पोलंडमध्ये जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. युक्रेनमधून हजारो लोक पोलंडमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातून केवळ युक्रेनच्या लोकांना आत सोडण्यात येत होतं. या गर्दीतल्या भारतीय विद्यार्थ्यांना वेगळं काढून आधी युक्रेनच्या पोलिसांनी लाठ्या काठ्यांनी तुफान मारहाण केली. 

मारहाणीनंतर 10 तास बसवून ठेवल्यावर विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये सोडण्यात आलं. पोलंडमध्ये पोलीश अधिका-यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींनाही पुन्हा मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे अक्षरशः भयानक हाल झाले आहेत. युक्रेनमधून महाराष्ट्रात परतणा-या साक्षी इजनकर या विद्यार्थिनीने झी 24 तासला यासंदर्भात सगळा भयानक अनुभव सांगितला. 

पोलंड सीमेसारखाच अनुभव रोमानियाच्या सीमेवरही भारतीय विद्यार्थ्यांना आलाय. विद्यार्थी दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट करत रोमानियाची सीमा गाठत आहेत. सीमेवर त्यांना कित्येक तास बसवलं जातंय. अपमानित झालेल्या या विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू आवरणं कठीण झालं आहे.